देशी जुगाड करुन बनविले आधुनिक कोळपणी यंत्र चिंचोली गुरव येथील बापलेकाने लावला अनोखा शोध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीण भागात देखील संशोधक वृत्ती दडलेली असते, फक्त त्या कल्पनाशक्तीला वाव मिळाली की ते आपोआप बाहेर येते. असाच एक अनोखा शोध चिंचोली गुरव (ता.संगमनेर) येथील शेतकरी बापलेकाने लावला आहे. त्यांनी देशी जुगाड करुन आधुनिक कोळपणी यंत्र बनविले आहे. यामुळे शेतकर्यांसाठी ते वरदान ठरणार आहे.

आपला वडिलोपार्जित वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळत आधुनिकतेला तंत्रज्ञानाची जोड देत कल्पनाशक्तीच्या जोरावर शेतकर्यांसाठी उपयुक्त असे अवघ्या ३० ते ४० हजार रुपयांत हे कोळपणी यंत्र बनवले आहे. हे यंत्र बनविण्यासाठी त्यांना साधारणपणे २ महिन्यांचा कालावधी लागला. या यंत्राला पुढच्या बाजूने ५ अश्वशक्तीचे इंजिन बसविले असून ते स्वयंचलित चालण्यासाठी त्याला अॅक्सीलेटर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता येणार्या काळात हे यंत्र शेतकर्यांना फायदेशीर ठरणार आहे.

चिंचोली गुरव येथील अतिशय सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील रामनाथ सोनवणे व समाधान सोनवणे या बापलेकाने आपला वेल्डिंगचा व्यवसाय सांभाळात असतानाच कुठेतरी शेतकर्यांचे कष्ट कमी व्हावे, तसेच शेतात कमी वेळात जास्त काम व्हावे आणि पैशांची देखील बचत व्हावी यासाठी एक अत्याधुनिक कोळपणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राद्वारे सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांची कोळपणी तर होणारच आहे. परंतु वाफे अथवा सरी पाडण्यासाठी देखील या यंत्राचा उपयोग होणार असून फवारणी मशीन देखील या यंत्रावर बसविणार असल्याचे बापलेकाने सांगितले आहे. त्यामुळे या बापलेकाने बनविलेल्या बहुउपयोगी यंत्राची सर्वदूर चर्चा होताना दिसून येत आहे. पुढील काळात हे बापलेक शेताची नांगरणी व पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना परवडेल असा अत्याधुनिक पद्धतीचा ट्रॅक्टर बनविणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
