संगमनेरचा पठारभाग बनतोय चोरट्यांचा ‘केंद्रबिंदू’!
संगमनेरचा पठारभाग बनतोय चोरट्यांचा ‘केंद्रबिंदू’!
गायी, दुचाकी, पाठोपाठ आता स्विफ्ट कारचीही चोरी
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याचा पठारभाग गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच ‘टार्गेट’ केला आहे. गायी, दुचाकी चोरी गेल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा चोरट्यांनी रविवारी (ता.25) पहाटे बोटा गावातून स्विफ्ट कार चोरून पोबारा केला आहे. त्यामुळे घारगाव पोलीस नेमके करतात तरी काय असा प्रश्न सर्व सामान्यांतून विचारला जात आहे.
सहा दिवसांपूर्वीच बिरेवाडी येथील नवनाथ ढेंबरे या पशुपालकाने आपल्या नव्वद हजार रूपये किंमतीच्या दोन जर्शी गायी घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बांधल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पहाटेच्या वेळी दोन्ही गायी चोरून पोबारा केला आहे. ऐन कोरोनाच्या काळात गायी चोरी गेल्याने ढेंबरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास अद्याप लागलाही नाही. तोच पुन्हा चोरट्याने दिवसाढवळ्या घारगाव बसस्थानक येथून रोहिदास काशिनाथ तळपे यांची पस्तीस हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून पोबारा केला आहे. याही दुचाकी चोरीचा शोध लागला नाही.
या चोरीच्या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा तीन ते चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी बोटा येथील गणेश गंगाधर पवार यांची दोन लाख रूपये किंमतीची स्विफ्ट कार (क्र.एम.एच. 18, डब्ल्यू.6525) ही चोरून पोबारा केला आहे. त्यामुळे चोरट्यांचे पठारभागात चांगलेच फावलेले दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावरुन घारगाव पोलिसांचा वचक राहिला नसल्याने चोरट्यांना मोकळे रान झाले असल्याचे अधोरेखीत होत आहे. आधीच कोरोनामुळे सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडले आहेत. त्यात गायी, दुचाकी व कार चोरी जाण्याने नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपावलीचा सणही काही दिवसांवर येवून ठेपला आहे. यामुळे सणासुदीमध्ये तरी नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईसाठी कंबर कसणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन दीपावलीत चोर्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.