‘मनसे’कडून नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांना गुलाल व पुष्प अर्पण करुन साष्टांग दंडवत!
‘मनसे’कडून नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांना गुलाल व पुष्प अर्पण करुन साष्टांग दंडवत!
तीन दिवसांत शासनाने दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 हा खड्डे आणि अपघातामुळे कायमच चर्चेत असतो. कोरोना टाळेबंदीपासून या महामार्गावर छोटी-मोठी दुरूस्ती करण्यात आली. मात्र पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नगरपासून ते पुढे राहुरी व शिर्डीपर्यंत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जनतेला आणखी एक पीडा लागली आहे ती म्हणजे रस्त्यांची. खचलेला रस्ता, जागोजागी खड्डे, साचलेला चिखल, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी अशी रस्त्याची दुरवस्था जागोजागी पहायला मिळत आहे. याची दखल घेत कोपरगावच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक सोमवारी (ता.26) आंदोलन पुकारुन गांधीगिरी करत महामार्गावरील खड्ड्यांना गुलाल व पुष्प अर्पण करुन साष्टांग दंडवत घातला. येत्या तीन दिवसांत शासनाला जाग आली नाही अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या महामार्गाबाबत सातत्याने माध्यमांद्वारे आवाज उठविला जात आहे. मात्र त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ता आणखी खराब झाला आहे. यामुळे रस्त्याबाबत नागरिकही समाज माध्यमांवरुन टीका करू लागले आहेत. दरम्यान, अहमदनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी थेट केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून हकीगत सांगितली आहे. या दरम्यानच, राज्याचे सार्वजनिक बांधकाम अशोक चव्हाण यांनी मंत्रालयात माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाचे सचिव व अधिकार्यांची बैठक घेत वस्तुस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुरुस्तीसाठी तातडीने 40 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले. तसेच महामार्गाच्या मजबुतीकरणाचा आणि रुंदीकरणाचा प्रस्ताव नव्याने तयार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
परंतु, अतिवृष्टीने महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अत्यंत वर्दळीचा हा मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. अपघातांची श्रृंखला कायम असून अनेक निरपराध लोकांचे जीव गेले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व जडले आहे तर अनेकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले आहेत. त्यात कोरोनामधून जनजीवन पूर्वपदावर येत असताना नागरिकांची वर्दळ देखील वाढली आहे. त्यामुळे महामार्गावरील कोल्हार आणि बाभळेश्वर पुलाचे चौपदरीकरण करणे, पुणतांबा फाटा आणि कोपरगाव येथे उड्डाणपुलाची कामे पूर्ण करणे, रस्त्याच्या दुतर्फा गटारांची कामे करणे, नागरी वस्ती असलेल्या भागांतील साईडपट्ट्यांचे काम करणे आदी कामे प्राधान्याने तात्काळ करावीत अशा मागण्या नागरिकांतून आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेने सोमवारी आंदोलन करत पुन्हा एकदा शासनासह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काही दिवसांवर दीपावलीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत शासनाला जाग आली नाही अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, तालुका मार्गदर्शक सुनील फंड, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, राहुल पांडे, शंकर होडे, प्रमोद आरणे, शुभम शिंदे, बाळा बोरसे, अजय पवार, विजय पवार आदिंनी आंदोलनस्थळावरुन दिला आहे.