गणपीरदरा पाझर तलाव तुडूंब भरून वाहू लागला
गणपीरदरा पाझर तलाव तुडूंब भरून वाहू लागला
उपसरपंच सुरेश कान्होरे व नागरिकांनी केले जलपूजन
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा गावासह आजूबाजूच्या गावांना वरदान ठरणारा गणपीरदरा येथील पाझर तलाव तुडूंब भरून वाहू लागल्याने सर्व सामान्य शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर उपसरपंच सुरेश कान्होरे यांच्यासह नागरिकांनी जलपूजन केले.

आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या गणपीरदरा येथे हा पाझर तलाव आहे. या पाझर तलावाचा आंबीखालसा गावासह आजूबाजूच्या गावांनाही चांगलाच फायदा होत असतो. दरवर्षी पावसाळ्यात पाझर तलाव तुडूंब भरून वाहत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शेतकर्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होते. यावर्षी देखील तलाव तुडूंब भरून वाहू लागल्याने सर्व सामान्य शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या पार्श्वभूमीवर गावचे उपसरपंच सुरेश कान्होरे, सामाजिक कार्यकर्ते चेतन कहाणे, शेतकरी संघटनेचे सिराज शेख, फुलांचे व्यापारी इब्राहिम सय्यद, कैलास पापळ, आंबी-माळेगाव सोसायटीचे अध्यक्ष गोकुळ कहाणे आदिंनी जलपूजन केले आहे. दरम्यान, यावेळी बोलताना उपसरपंच कान्होरे म्हणाले, 1972 साली या पाझर तलावाचे काम झाले आहे. तेव्हापासून हा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. मात्र पाझर तलावाला मोठी गळती लागली असल्याने तलावात जास्त दिवस पाणी राहात नाही. तरी संबंधित विभागाने या पाझर तलावाची दुरूस्ती करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

