आश्वासनांना वैतागून ग्रामस्थांचा लोकसहभागातून रस्ता साकारण्याचा निर्णय!

आश्वासनांना वैतागून ग्रामस्थांचा लोकसहभागातून रस्ता साकारण्याचा निर्णय!
बावपठार ग्रामस्थांचा अनोखा निर्णय; प्रश्न सोडविल्याचा सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद
नायक वृत्तसेवा, घारगाव
वर्षानुवर्षांपासून झालेली रस्त्याची दयनीय अवस्था, त्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला वैतागून अखेर संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर गावांतर्गत असलेल्या बावपठार ग्रामस्थांनी लोकसहभागातून रस्ता साकारण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन एकजुटीतून आपले प्रश्न आपणच आपल्या स्तरावर सोडविल्याचा आनंदही ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असल्याचे दिसले.


यावर्षी मान्सूनने सर्वत्र हाहाकार केला आहे. जवळपास सर्वच छोटी-मोठी धरणेही तुडूंब भरली. तरी देखील वरुणराजा विश्रांती घेण्याचे नाव घेईना. यामुळे खरीप हंगामातील पिकांची संपूर्ण नासाडी झाली आहे. तर अनेक ठिकाणच्या रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झाली आहे. असेच चित्र संगमनेर तालुक्याच्या पठारभागात सध्या पहावयास मिळत आहे. सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पठारभागातील वाड्या-वस्त्यांवरील संपूर्ण रस्ते चिखलमय झाले आहेत. यापूर्वी देखील येथील रस्त्यांची अवस्था दयनीयच होती. याबाबत अनेकदा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही नागरिकांची कुणीही दखल घेतली नाही. एरव्ही, निवडणुकीच्या काळात ‘मतदार राजा’ म्हणून मतांचा जोगवा मागण्यासाठी पायपीट करत लोकप्रतिनिधी वाड्या-वस्त्या पालथ्या घालतात. परंतु, दिलेल्या आश्वासनांना सोईस्कररित्या हवेत विरवतात. यामुळे वैतागलेले बावपठारचे ग्रामस्थ लोकसहभागातून रस्ता करण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी मोठ्या काबाडकष्टातून गोळा केलेली पुंजी देखील देतात.


अखेर, कोरोनाच्या संकटात आर्थिक कंबरडे मोडलेले असतानाही दैनंदिन वापराचा रस्ता असल्याने एक हजार, दोन हजार रुपयांची पुंजी गोळा करत सुमारे एक लाख रूपयांच्या आसपास निधी जमा केला. आणि शनिवारी (ता.25) सकाळी प्रत्यक्ष शुभकार्याला सुरुवात झाली. जेसीबी आणि ढंपरच्या सहाय्याने रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी ग्रामस्थ एकजुटीने काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिखलातून वाट शोधत आपले निश्चित ठिकाण गाठत काम पूर्ण करण्यास आता काहीसा विराम मिळणार आहे. या रस्त्याचे काम झाल्यास विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांना सहजरित्या प्रवास करणे सोपे होणार आहे. तर अनेकांना दवाखान्यात जाण्यासही विलंब होणार नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी लोकसहभागातून काम केल्याचा आनंदही ग्रामस्थांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असल्याचे दिसले.

बावपठार येथील रस्त्याचे काम व्हावे म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे उंबरठे झिजवले. परंतु कोणीही आमची दखल घेतली नाही. त्यातच यावर्षीच्या पावसाने हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने आम्ही गावकर्‍यांनी लोकसहभागातून रस्ता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आणि आज रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू केले.
– भाऊसाहेब भागवत (माजी सरपंच, नांदूर)

Visits: 10 Today: 1 Total: 115280

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *