पाथरे बुद्रुक येथे बहीण-भावाचा विषबाधेमुळे मृत्यू
पाथरे बुद्रुक येथे बहीण-भावाचा विषबाधेमुळे मृत्यू
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील दोन सख्ख्या बहीण-भावाचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना ऐन विजयदशमीला रविवारी (ता.25) घडली आहे. दरम्यान, दोन्ही भावंडे चार ते पाच वर्षांचे असून त्यांचे मामा व आजीवर लोणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पाथरेतील एका गल्लीत वसीम रजाक शेख हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. ते आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. वसीम यांचा मुलगा अरहान (वय 5 वर्षे) व मुलगी आयेशा (वय 4 वर्षे) असून वसीम यांची पाथरे नजीक हणुमंतगाव (कोंबडवाडी) येथे सासुरवाडी आहे. दोन्ही मुले अरहान व आयेशा यांचे नेहमी मामा शाविद आजिज शेख यांचे घरी येणे-जाणे होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेहमीप्रमाणे अरहान व आयेशा मामा शाविद यांच्या घरी गेले असता दरम्यानच्या काळात मामा शाविद व सदर भाचा-भाचीसह शाविदचे कुटुंबीय यांना दोन दिवसांपासून शारीरिक अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांनी सोनगाव सात्रळ येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अरहान, आयेशा, मामा शाविद व आजी शबाना यांची प्रकृती खालावत चालल्याने नातेवाईकांनी त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी मुलगा अरहान यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने मुलगी आयेशा हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन भाच्यांचा दुर्दैवी मृत्यूची वार्ता मामा शाविद यांना समजल्याने त्यांना मानसिक धक्का बसल्याने रुग्णालयातच पुढील उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. आजी शबानाही रुग्णालयात उपचार घेत आहे. लोणी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.