शिक्षकाची तक्रार केल्याने ग्रामसभा घेवून पालकांनाच धमक्या! कुरकुंडीतील धक्कादायक प्रकार; बळजबरीने माफीनामाही लिहून घेतला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रत्येक नागरिकाला व्यवस्थेत सामावून घेण्याच्या उदात्त संकल्पनेतून निर्माण झालेल्या ग्रामपंचायतींनी गेल्या चार दशकांत उल्लेखणीय कामगिरी करताना देशाच्या ग्रामीणभागाचा संतुलित विकास साधण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील हिवरेबाजार सारख्या ग्रामपंचायतीच्या पथदर्शी कामाने तर देशासमोर नवा आदर्श निर्माण झाला असताना त्याच जिल्ह्यातील कुरकुंडीची ग्रामपंचायत मात्र ‘वतना’च्या मानसिकतेकडे झुकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या गावातील जिल्हा परिषदेत शाळेत शिकणार्‍या आपल्या पाल्यांकडे वर्गशिक्षक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार काही पालकांनी केली होती. त्याची दखल घेवून कारवाई होणं अपेक्षित असताना गावच्या सरपंचबाईंनी पालक मेळावा घेण्याऐवजी ग्रामसभा बोलावून चक्क तक्रारदार पालकांनाच दमात घेतले. यावेळी ग्रामसभेत हजर असलेल्या काहींनी ठरवून केलेल्या कृतीप्रमाणे ‘त्या’ सर्व पालकांवर व्यक्तिगत टिपण्णी करीत दहशतही निर्माण केली. त्यातून माहौल बदललेल्या ‘कथीत’ ग्रामसभेने त्या पालकांकडून बळजबरीने ‘माफीनामा’ लिहून घेतल्याची तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. या वृत्ताने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून संबंधित ग्रामपंचायत जणू आपणांस वतनाप्रमाणे आंदणच मिळाल्याचे समजून गावच्या सरपंच शाईन चौघुले कामकाज करीत असल्याचा गंभीर आरोप होत आहे.


याबाबत पालकांच्यावतीने कुरकुंडीतील शम्मा जाकीर पठाण या पालक महिलेने संगमनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना तक्रारअर्ज सोपवला आहे. त्यानुसार त्यांचा पाल्य गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिकतो. सदर शाळेचे मुख्याध्यापक तथा मुलाचे वर्गशिक्षक त्यांच्या मुलाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन त्याला व्यवस्थित शिकवत नाहीत. त्यामुळे त्याची शैक्षणिक प्रगती खुंटून शालेय परीक्षांच्या निकालपत्रकातून वारंवार निराशा हाती येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. असा प्रकार केवळ त्यांच्याच पाल्यासोबत घडत नसून अशाप्रकारची तक्रार असलेले गावातील अन्य आठ ते दहा पालक असल्याचा उल्लेखही तक्रारअर्जात करण्यात आला आहे.


शाळेच्या मुख्याध्यापकांबाबत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी पालक मेळावा बोलवावा अशी विनंती गावच्या सरपंच शाईन चौघुले यांच्याकडे केली. मात्र त्यांनी आपल्याच मनमर्जीनुसार शाळेच्या तक्रारींसाठी पालकांशी संवाद साधण्याऐवजी ग्रामसभा बोलावली. या सभेत शाळेतील ‘त्या’ शिक्षकाबाबत असलेल्या तक्रारीचा ऊहापोह करताना ज्यांचा शाळेशी अथवा त्या संबंधी प्रश्‍नांशी कोणताही संबंध नाही अशा आठ ते दहा लोकांना जणू पूर्वतयारी केल्याप्रमाणे बोलण्याची संधी दिली गेली. त्यातून त्या लोकांनी चक्क ग्रामसभेत तक्रारदार पालकांवरच प्रश्‍न उपस्थित करायला सुरुवात केली. यावेळी खुद्बुद्दीन पठाण, निसार पठाण, अश्पाक पठाण, परवीन पठाण, तौसिफ पटेल, तुकाराम पवार, पप्पू चौघुले व सरपंच शाईन चौघुले यांनी तक्रारअर्ज मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला.


भरसभेत ‘महिला बचतगट चालवतात म्हणून आता खूप शहाण्या झाल्या आहेत. यांचे बचतगटच बंद करुन टाका..’ अशा दरडावणीच्या स्वरात तक्रारदार पालकांना धमक्या देत महिला सरपंचाच्या समक्ष पालक महिलांचा अपमान करीत पुरुषी मानसिकताही दाखवण्यात आली. त्यामुळे उपस्थित पालकांमध्ये दहशत निर्माण झाल्याचा पूर्वनियोजित फायदा घेत वरील आठ-दहा लोकांच्या गोंधळातून दाखल तक्रारीबाबत पालकांकडून बळजबरीने ‘माफीनामा’ लिहून घेतला गेला त्यासाठी बदनामी करण्याची धमकीही देण्यात आली.


ग्रामसभेत झालेल्या अपमानानंतर घरी परतलेल्या पालक महिलेने गावातील या हुकूमशाही विरोधात आवाज उठवण्यासाठी संगमनेरच्या गटविकास अधिकार्‍यांकडे धाव घेतली असून या गोष्टीला चार दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यावरुन गटविकास अधिकारीही कुरकुंडीच्या सरपंचांसह जनतेच्या करातून लाखभर पगार घेणार्‍या ‘त्या’ शिक्षकाला पाठीशी घालीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तालुक्यात आणि विशेषतः पालक वर्गात संताप निर्माण झाला आहे.


दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी ग्रामीण भारतात राहणार्‍या शेवटच्या घटकालाही व्यवस्थेत सामावून घेण्यासाठी पंचायतराज व्यवस्था कायम केली. त्या माध्यमातून ग्रामपातळीवरील विकास वेगाने होण्यास मदत झाली. त्यातून हिवरेबाजार सारख्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावचा सर्वकष विकास साधण्यासह आदर्श गावाची निर्मिती केली. आज हिवरेबाजारकडे देशात रोल मॉडेल म्हणून बघितले जात असताना त्याच जिल्ह्यातील कुरकुंडीच्या ग्रामपंचायतीत घडलेल्या प्रकाराने विरोधाभास निर्माण झाला आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून प्रशासनाने तत्काळ कारवाईची करण्याची गरज आहे, अन्यथा या गैरकारभाराचे लोण तालुक्यात सर्वत्र पसरण्याचीही भीती आहे.

Visits: 292 Today: 1 Total: 1111992

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *