संगमनेर बसस्थानक बनलंय रात्रीच्या गुन्हेगारीचे केंद्र! पुन्हा ‘सशस्त्र’ हाणामार्‍या; एकावर चाकूने जीवघेणा हल्ला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या वैभवात भर घालणारी इमारत म्हणून लौकीक असलेले संगमनेर बसस्थानक आता वाढत्या घटनांमुळे गुन्हेगारीचे केंद्र ठरु लागले आहे. दिवसा प्रवाशांचे दागिने लांबवण्याच्या घटना थांबत नसतानाच आता रात्रीच्या अंधारातही टोळक्यांकडून दहशत माजवण्याचे प्रकार सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर असतानाच आता पुन्हा एकदा मागील वादाच्या रागातून दोघांनी एकावर सशस्त्र हल्ला करुन त्याला जखमी केले. यावेळी जखमी तरुणाच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. संगमनेर बसस्थानकाच्या अगदी प्रवेशद्वारातच घडलेल्या या घटनेने या वैभवशाली इमारतीला गुन्हेगारीचा डाग लागत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सोमवारच्या घटनेत जखमी झालेल्या मयूर अभंग याच्यावर घरगुती वापराच्या चाकूने हल्ला झाला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.20) रात्री साडेदहाच्या सुमारास संगमनेर  बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. राजवाडा परिसरात राहणारा मयूर नितीन अभंग (वय 18) हा तरुण आपल्या एका मित्रासह रात्री साडेदहाच्या सुमारास संगमनेर बसस्थानकाजवळ आला होता. त्यावेळी तेथे आधीपासूनच हजर असलेल्या आदित्य दीपक दारोळे (रा.राजवाडा) आणि निखिल रोकडे (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांनी त्यांना आडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूने हमरीतुमरी सुरु असतानाच आदित्य दारोळेने घरगुती वापराच्या छोट्या चाकूने मयूरच्या मानेसह पोटावर एकामागून एक वार केले. या घटनेमागे मागील वादाचे कारण सांगितले जात असले तरीही बसस्थानकासारख्या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी थेट चाकूचा वापर करुन एखाद्यावर हल्ल्याचा प्रकार खूप गंभीर आहे.


हा प्रकार सुरु असताना मयूर सोबत असलेल्या त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र निखिल रोकडेने त्याला त्यापासून रोखून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जवळपास पंधरा मिनिटे चाललेल्या या हाणामारीनंतर जखमी झालेल्या मयूर दारोळे याला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आदित्य दीपक दारोळे (रा.राजवाडा) व निखिल रोकडे (रा.संगमनेर) या दोघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 118 (1), 115, 351 (2), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस हवालदार गोणके करीत आहेत.


गेल्या महिन्यातही याच ठिकाणी एका तरुणावर तिघा-चौघांनी हल्ला करुन बेदम मारहाण केली होती. रात्रीच्यावेळी घडलेल्या त्या घटनेतही पूर्ववैमनस्याचा आधार दिला गेला, मात्र त्यासाठी बसस्थानक चौकाचीच निवड कशासाठी हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहीला. त्यात आता सोमवारच्या घटनेचीही भर पडल्याने कोणत्याही सुरक्षेशिवाय रात्री ओसाड पडणार्‍या या व्यापारी संकुलात गुन्हेगारी कारवाया तर होत नसतील? अशाही शंका निर्माण झाल्या आहेत. दत्त मंदिराच्या बाजूकडे वास्तव्यास असलेल्या काही भिक्षेकर्‍यांमधील एक-दोन महिला रात्रीच्यावेळी गैरप्रकार करीत असल्याचे वारंवार समोर येत असतानाच आता एकामागून एक हाणामारीच्या घटनाही घडू लागल्याने संगमनेर बसस्थानक रात्रीच्या वेळी गुन्हेगारांचे केंद्र तर ठरत नाहीये असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.


खरेतरं संगमनेरच्या या प्रशस्त इमारतीचा जिल्ह्यात वेगळाच लौकीक आहे. मुख्यालयातच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यात अशी दुसरी वास्तू नाही अशी वेगळी ओळख असलेल्या संगमनेर बसस्थानकातून प्रवाशी महिलांचे ऐवज लांबवण्याच्या एकामागून एक घटना घडतच आहेत. एकाच दिवसांत 20-20 तोळ्यांचे दागिने लंपास करण्याच्या धक्कादायक घटनाही अलिकडच्या काळातच समोर आल्या आहेत. त्यातील एकाही घटनेचा मागमूस नसताना आता रात्रीच्या अंधारातही या वास्तूत गुन्हेगारी घटना घडू लागल्याने आश्‍चर्य निर्माण झाले आहे. पोलिसांनी वाढत्या घटनांची गांभीर्याने दखल घेवून रात्रीच्या अंधारात या संकुलातील गुन्हीगारी वृत्तींचा वावर रोखण्याची गरज व्यक्त होत आहे.


पुणे-नाशिक महामार्गाच्या लगतचा प्रशस्त परिसर, दोन भागांमध्ये दुमजली व्यापारी संकुल, मध्यात प्रशस्त प्रवेशद्वार, दत्ताचे मंदिर आणि बक्कळ जागा असा थाट असलेल्या संगमनेर बसस्थानकात प्रवाशी महिलांचे दागिने लंपास करण्याचे प्रकार नियमित आहेत. त्यातील एकाही घटनेचा तपास नसल्याने महिलांकडून पोलिसांच्या नावाने बोटं मोडली जात असतानाच आता रात्रीच्या अंधारातही टोळक्याने जमून दहशत निर्माण करण्याच्या एकामागून एक घटना घडू लागल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न निर्माण होत आहेत. गुन्हेगारांचा वावर होवू नये यासाठी रात्री दहा वाजता व्यवसाय बंद करण्याचे फर्मान असताना त्यानंतर अवघ्या अर्धातासातच अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी टोळक्याचा धुडगूस आणि त्यात शस्त्रांचा वापर पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्‍न निर्माण करणारा आहे.

Visits: 57 Today: 1 Total: 258043

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *