चायना मांजाने घात केला, तरुणाचा गळा चिरला! संगमनेरातील भयानक घटना; अत्यवस्थ अवस्थेतील तरुण ‘व्हेंटीलेटरवर’..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिवाळ्याच्या मध्यकाळात सुरु होणारी पतंगबाजी मानवी जीवांसह पशू-पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे उदाहरण आता संगमनेरातूनही समोर आले आहे. या भयानक घटनेत दुचाकीस्वाराच्या गळ्याला लागलेल्या चायना मांजाने त्याचा निम्मा गळा चिरुन रक्तपुरवठा करणार्या वाहिनीसह श्वासनलिकाही कापली. त्यामुळे क्षणात अत्यवस्थ झालेल्या त्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून 30 टाकेही घालण्यात आले आहेत. गंभीर जखमी झालेल्या अनिकेत कटारनवरे या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याला कृत्रित श्वसन यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले आहे. या घटनेत त्याचा मामेभाऊ देखील जखमी झाला असून त्याचा हात कापला गेला आहे. या प्रकरणी जखमी झालेल्या दुसर्या तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ‘अज्ञातावर गुन्हा दाखल होत नाही..’ असे ‘अजब’ उत्तर त्याला देण्यात आले.
या घटनेत जखमी झालेल्या प्रफुल्ल घुसळे यांनी दैनिक नायकला दिलेल्या माहितीनुसार सदरचा भयानक प्रकार काल सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडला. क्रीडा संकुलाजवळ राहणारे घुसळे आपला मामेभाऊ अनिकेत संजय कटारनवरे (वय 23, रा.सिन्नर, जि.नाशिक) याच्यासोबत सिन्नरहून संगमनेरकडे येत होते. त्यांची दुचाकी पुणे-नाशिक महामार्गावरील पाटीलवाडा हॉटेल (कृष्णा लॉन्स) जवळ आली असता अचानक महामार्गाला आडवा आलेला चायना मांजा दुचाकी चालवणार्या अनिकेतच्या गळ्याला लागला. यावेळी सुरुवातीला त्याने तो हाताने बाजूला करुन वाहन थांबवण्याचाही प्रयत्न केला. मात्र प्रयत्नात त्याचा हातही कापला गेला. दरम्यान पाठीमागे बसलेल्या प्रफुल्ल घुसळे त्यांनीही त्यांच्या गळ्याला लागलेला मांजा हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने दुसर्या बाजूने वेगात जाणार्या मोठ्या वाहनांनी तितक्याच वेगाने तो ओढला गेल्याने अवघ्या क्षणातच खूपकाही घडून गेलं.
हा प्रकार घडला त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा वेग फारसा नसल्याने अनिकेतने काही अंतरावरच त्यावर नियंत्रण मिळवून दुचाकी थांबवली. मात्र तो पर्यंत चायना मांज्याने त्याचा गुणधर्म दाखवून अनिकेतचा निम्मा गळा चिरला होता. त्यातही रक्तपुरवठा करणार्या मुख्य वाहिनीसह श्वसनक्रियेला संलग्न असणार्या नलिकेसह काही छोट्या वाहिन्याही कापल्या गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला होता. त्यात हाताला झालेल्या जखमांमधून वाहणार्या रक्ताचीही भर पडत होती. घटनेच्यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या घुसळे यांनीही आपल्या मामेभावाला वाचवण्याच्या प्रयत्नात आपले हात कापून घेतलेले असल्याने त्यांच्या हातातून रक्तस्राव सुरु होता. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी अनिकेतला पाठीमागे बसवून बायपास रस्त्यावरुन खाली उतरुन थेट खासगी रुग्णालय गाठले.
तेथील डॉक्टरांनीही तितक्याच तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन त्याचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला. त्याच्या गळ्यावर शस्त्रकियेद्वारे नलिका जोडण्याचे आव्हान वैद्यकीय पथकासमोर असून त्यासाठी मोठा खर्चही येणार आहे. सध्या अनिकेत कटारनवरे या तरुणाला कृत्रिम श्वसन यंत्रणेद्वारा ऑक्सिजनाचा पुरवठा सुरु असून या अपघातात त्याची श्वास नलिकाही कापली गेली आहे. त्याची स्थिती अत्यंत नाजूक असून तातडीने काही शस्त्रक्रियाही कराव्या लागणार आहेत. या घटनेत नाहक जखमी झालेला अनिकेत अतिशय सामान्य कुटुंबातला असून घरी छोटा भाऊ आणि मोलमजूरी करणारे आई-वडील आहेत.
येणार्या दिवसांत त्याच्यावरील उपचाराचा खर्चही वाढणार आहे. मात्र घरची स्थिती बेताची असल्याने त्याच्या कुटुंबासमोर आर्थिक् आव्हान उभे राहीले आहे. या घटनेतून सावरण्यासाठी अनिकेतला मदतीची गरज आहे, दानशूरांनी पुढे यावे व अनिकेतला जीवदान द्यावे असे आवाहन त्याचा मामेभाऊ प्रफुल्ल घुसळे यांनी केले आहे. सध्या अनिकेतवर संगमनेरच्या मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात अनिकत कटारनवरे याचा कोणताही दोष नव्हता. संक्रांतीपूर्वी प्रशासनाने खबरदारी म्हणून छापेमारीची कारवाई केली, त्यातून चायना मांजा चर्चेतही आला. या मांजाने घडणार्या घटना ऐकून लोकांमध्ये जागृती झाली असावी असं संक्रांतीपर्यंत जाणवत होतं. पण कालच्या घटनेने काहीजण आपल्या आनंदासाठी लोकांचा जीव घेण्यातही मागेपुढे बघत नाहीत याचा अनुभव देणार्या या घटनेनंतर शहरातून हळहळ वर्तवली जात आहे.
खरेतर माणसांसह पशू-पक्ष्यांच्या जीवालाही घोर लावणार्या अशा घटनेत पोलिसांनीच पुढाकार घेवून सदोष मनुष्यवधासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करुन एखाद-दोन कारवाया केल्या तर लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल. कोणताही आनंद माणसाच्या जीवापेक्षा मोठा असू शकत नाही. त्यामुळे वारंवार आवाहन करुनही लोकांमधील प्रवृत्ती तशीच राहणार असेल तर, प्रशासनानेही कायद्याचा बडगा उगारण्याची गरज आहे. अन्यथा चायना मांजा बंदीचाही भविष्यात गुटख्याप्रमाणे हप्तेखोरीसाठी वापर ठरलेला आहे अशा संतप्त प्रतिक्रिया या घटनेनंतर समोर येत आहेत.
या भयानक घटनेत गंभीर जखमी झालेला अनिकेत संजय कटारनवरे हा 23 वर्षीय तरुण अतिशय सामान्य कुटुंबातला असून सिन्नर (ता.नाशिक) येथील रहिवाशी आहे. त्याच्या कुटुंबात मोल-मजुरी करणारे आई-वडील आणि छोटा भाऊ आहे. सध्या त्याच्यावर संगमनेरच्या ‘मेडिकव्हर रुग्णालयात’ उपचार सुरु असून त्याच्या गळ्यातील अनेक मुख्य वाहिन्यांसह छोट्या वाहिन्या कापल्या गेल्याने पुढील कालावधीत त्याच्यावर अनेक शस्त्रक्रियाही होणार आहेत. त्यासाठीचा खर्च भागवणं त्याच्या कुटुंबासाठी खूप अवघड आहे. समाजातील दानशूरांनी मदत केल्यास अनिकेतला जीवदान मिळेल असे आवाहन त्याचा मामेभाऊ प्रफुल्ल घुसळे याने केले आहे. (अनिकेतचा मोबाईल क्रमांक 96659 53912)