संगमनेरातील अपघातग्रस्त महिलेला ‘नातेवाईकांची’ प्रतीक्षा! अपघातानंतर 108 ने वाचवले प्राण; मात्र डोक्याला इजा झाल्याने महिला झाली अबोल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन दिवसांपूर्वी अपघात झालेल्या संगमनेर तालुक्यातील एका महिलेला अपघातग्रस्तांसह ग्रामीण नागरिकांना जीवनदायी ठरलेल्या 108 रुग्णवाहिकेने वाचवले आहे. सदरची महिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची आरोग्य स्थिती सध्या स्थीर आहे. मात्र सदर महिलेच्या डोक्याला मार लागलेला असल्याने सद्यस्थितीत त्यांना आपले नाव व पत्ता सांगण्यात अडचणी येत आहेत. नाशिक रुग्णालयाचे मेंदुविकार तज्ज्ञ डॉ.निलेश जेजूरकर यांनी मोठ्या प्रयत्नानंतर सदर महिलेकडून संतोष आणि आतिष मोरे अशी दोन नावे त्यांच्याकडून लिहून घेतली असून त्या आधारे त्यांच्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न सुरु असून संगमनेरकरांनीही या मोहीमेत साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका महिलेला स्थानिकांनी माहिती दिल्यावरुन 108 रुग्णवाहिकेतून सुरुवातीला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सदरच्या अपघातात त्या महिलेच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी त्याच 108 रुग्णवाहिकेतून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (सिव्हील) पाठविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून अपघाताच्या धक्क्यातून सावरलेल्या महिलेची आरोग्यस्थिती सध्या स्थीर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्यांनी सदर महिलेकडून त्यांचे नाव, गाव व पत्ता याबाबतची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काहीच सांगता येत नसल्याने त्यांचाही नाईलाज झाला.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील मेंदु विकार तज्ज्ञ डॉ.निलेश जेजूरकर यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही सदर महिलेला
बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेच्या डोक्याला गंभिर दुखापत झालेली असल्याने त्यात त्यांना अपयश आल्यानंतर त्यांनी त्या महिलेला कागद आणि पेन देवून नाव व गाव लिहीण्यास सांगीतले. त्यानुसार सदर महिला दिलेल्या कागदावर फक्त संतोष मोरे आणि आतिष संतोष मोरे अशी नावे लिहून देत आहे. त्यापुढे काही सांगण्यात त्या असमर्थ ठरत असल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयाने सोशल माध्यमात सदर महिलेचे नाव व त्यांनीच सांगीतलेल्या ‘त्या’ दोन नावांवरुन त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सोशल माध्यमात ‘व्हायरल’ झालेल्या रुग्णालयाच्या संदेशामध्ये ‘सदर अपघातग्रस्त महिलेला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्यास मदत करा’ असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी (ता.17) सदर महिलेला 108 रुग्णवाहिकेच्या चालकाने सुरुवातीला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर तेथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सदर महिलेची त्यावेळची अवस्था अतिशय गंभिर असल्याने स्थानिक आरोग्य यंत्रणांनी त्यांची ओळख पटविण्यापेक्षा त्यांना वाचवण्याला अधिक प्राधान्य दिले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले खरे, मात्र या अपघाताने सदर महिलेच्या डोक्याला गंभिर इजा झाल्याने सध्या त्यांना बोलण्यात अथवा काही सांगण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनीच आता माणुसकीची जबाबदारी पार पाडून या महिलेला सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

