खुनाचा प्रयत्न करणार्यास पाच वर्षांचा कारावास! जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा; अकोल्यात घडली होती घटना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून एकाने दुसर्यावर थेट चाकूने हल्ला केला. यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या दुसर्या इसमावरही आरोपीने वार करुन त्याला जखमी केले. या घटनेत एकाला गंभीर तर, दुसर्याला किरकोळ दुखापत झाली. 2016 साली अकोले शहरात घडलेल्या या प्रकरणात आरोपी भरत पांडूरंग भांगरे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होवून त्याला अटकही झाली होती. या घटनेचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक महिंद्र अहिरे यांनी पूर्ण करुन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावरील सविस्तर सुनावणीनंतर अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपी भांगरे याला दोषी ठरवून पाच वर्ष सक्तमजुरीसह 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, दंडाच्या रकमेतील निम्मी रक्कम फिर्यादीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

याबाबतची हकिकत अशी की, आठ वर्षांपूर्वी 4 मे 2016 रोजी अकोले शहरातील सारडा कॉम्प्लेक्समध्ये मोबाईल शॉपी चालवणार्या गणेश सुधाकर रासने (वय 28) यांचे वाशेरे येथील भरत पांडूरंग भांगरे (वय 60) याच्याशी अकोले बसस्थानकावर किरकोळ शाब्दीक भांडण झाले. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी निघून गेले. मात्र या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी भांगरे दुसर्या दिवशी पुन्हा अकोले शहरात आला व तो गणेश रासने यांना मारण्याची संधी शोधू लागला. या दरम्यान 5 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास गणेश रासने आपले मित्र अतुल नवले यांच्या नवले कॉम्प्लेक्समध्ये बोलत असताना अचानक तेथे आलेल्या आरोपी भरत भांगरे याने त्यांना शिवीगाळ करीत थेट आपल्याकडील चाकूने रासने यांच्यावर सपासप वार केले.

या घटनेत गणेश रासने यांच्या मानेवर आणि बरगडीजवळ वर्मी घाव लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. अचानक घडलेला हा प्रकार पाहुन अतुल नवले यांनी
मध्यस्थी करीत गणेश रासने यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीच्या डोक्यात सुडाची भावना असल्याने त्याने नवले यांच्यावरही हल्ला केला, त्यात त्यांच्या बोटांना दुखापत झाली. या प्रकारामुळे मोठा गदारोळ झाल्याने आसपासचे नागरिक घनास्थळी धावले, त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला. तेथे जमलेल्या दोघा-तिघांनी तत्काळ दोघाही जखमींना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जखमी गणेशचा भाऊ दिनेश रासने यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी भरत भांगरे याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासह मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्यावरुन गुन्हा दाखल करीत आरोपीला बेड्याही ठोकल्या व नंतर त्याची जामीनावर सुटकाही झाली.

या प्रकरणाचा तपास अकोल्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक महिंद्र अहिरे यांनी केला व संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात त्याचे दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर चालले. सरकार पक्षाच्यावतीने अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी सात साक्षीदारांची तपासणी केली. त्यांनी केलेला प्रबळ युक्तिवाद, पोलिसांनी सखोल तपासाअंती सादर केलेले पुरावे, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला घटनाक्रम ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी भरत पांडूरंग भांगरे (वय 60, रा.वाशेरे, ता.अकोले) याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा व 25 हजार रुपयांचा दंड सुनावला. दंडातील 12 हजार 500 रुपये जखमी गणेश रासने यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

