महाराष्ट्राच्या पराक्रमी गाथेने देशभरातील स्पर्धक भारावले! राष्ट्रीय योगासन अजिंक्यपद स्पर्धा; मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह ढोल-ताशाचा गजर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु असलेल्या तिसर्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या तिसर्या दिवशी रात्री मंचावर खास महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ही चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना देशभरातील 29 राज्यांमधून आलेल्या स्पर्धकांसह प्रेक्षकांमध्येही वीरश्री संचारली. शक्ती आणि चपळता यांचा संगम असलेल्या साहसी खेळांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
मंगळवार 27 डिसेंबरपासून संगमनेरात राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरु असून आज या स्पर्धेचा समारोप होणार आहे. देशातील 29 राज्यांमधून आलेले स्पर्धक, प्रशिक्षक, पंच, पालक या सर्वांच्या मनोरंजनासाठी गुरुवारी रात्री विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगमनेरमधील हिंदुराजा ढोल पथकाने विविध रचना सादर करून परिसर दणाणून सोडला. सर्वांनी ढोल पथकाच्या कलेचा मनस्वी आनंद घेतला. त्यानंतर ओंकार केसेकर व त्यांच्या टीमने महाराष्ट्राच्या मातीतील वैशिष्ट्यपूर्ण क्रीडा प्रकार असलेल्या मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि कसरती सादर केल्या. ‘मल्लखांब आज मजला सर्वात प्रिय आहे’ या गीतासह अनेक वीररसयुक्त गीतांच्या तालावर मल्लखांबपटूंनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली. तरुणांच्या एका पथकाने लाठी-काठी, दांडपट्टा, चक्र अशी विविध प्रात्यक्षिके विजेच्या चपळाईने सादर करून प्रेक्षकांना थक्क केले. स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या विविध राज्यांच्या योगासन संघटनांच्या पदाधिकार्यांचा आणि पंचांचा सन्मान यावेळी योगासनपटूची मूर्ती देऊन करण्यात आला.
स्पर्धेच्या आयोजनासाठी मागील पंधरा दिवस प्रचंड मेहनत घेणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील विविध समिती सदस्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. सत्काराचे निवेदन ध्रुवच्या प्रशासकीय विभागाचे प्रमुख सचिन जोशी यांनी केले. स्पर्धेचे व्यवस्थापक निरंजन मूर्ती यांनी आपल्या छोटेखानी भाषणामध्ये सर्वोत्कृष्ट आयोजनाचे उदाहरण म्हणजे ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये होत असलेली ही राष्ट्रीय योगासन स्पर्धा आहे. आपुलकी, आदरातिथ्य, सुविधा अशा सर्वच निकषांवर ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट ठरली आहे. येथे आलेल्या सर्वांना घरची आठवण येणार नाही इतकी काळजी येथे घेण्यात आल्याचे सांगितले. स्पर्धा निर्देशक रचित कौशिक यांनी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अत्याधुनिक क्रीडा नगरीत झालेली ही स्पर्धा दीर्घकाळ स्मरणात राहील अशा शब्दांत आयोजकांचे कौतुक केले.
राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाची आणि अनेक राज्यांच्या पदाधिकार्यांच्या सन्मानाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मोजक्या शब्दांत त्यांनी महाराष्ट्राचे वैशिष्ट्य उपस्थितांना सांगितले. ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असा हा आमचा महाराष्ट्र आहे. आम्ही सर्वजण शिवछत्रपतींचे मावळे आहोत. जे सांगायचे ते समोरासमोर सांगतो. आमचे स्वभाव नारळासारखे असतात. वरुण कठीण परंतु, आपुलकीचे आणि प्रेमाचे आरोग्यदायी पाणी भरलेले असते’ या आंतरिक प्रेमाने महाराष्ट्राच्यावतीने त्यांनी उपस्थितांचे स्वागतही केले.