गारपिटीने नुकसान; खांबे परिसराची प्रशासनाने केली पाहणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
निसर्गाचा समतोल बिघडल्याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना शनिवारी (ता.20) संगमनेरसह अकोले, नगर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा तालुक्यांत सायंकाळी आणि रात्री वादळी वार्यांसह गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची खांबे येथे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडल कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक आदिंनी नुकतीच पाहणी करुन आढावा घेतला आहे.
हवामान विभागाने गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता तो खराच ठरला आहे. आधीच कोरोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना या दुसर्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शनिवारी संगमनेरसह अकोले, नगर, पाथर्डी, शेवगाव, नेवासा या भागात पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. यामुळे डाळिंब, गहू, हरभरा, भाजीपाल्यासह आंब्याचे मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी सुमारे अर्धातास गारांचा पाऊस सुरू होता. हरभर्याच्या आकाराएवढ्या गारा बरसल्याचे शेतकर्यांनी सांगितले. सध्या अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू आहे. शेतात काढून ठेवलेल्या पिकाचे आणि काढणीला आलेल्या उभ्या पिकाचे यामुळे नुकसान झाले आहे. पावसात भिजलेला गहू आता पांढरा पडण्याची शक्यता असल्याने त्याला भाव कमी मिळणार आहे. फळबागांचेही नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहर वादळ आणि गारांमुळे गळून पडला आहे. डाळींब, द्राक्ष या पिकांचेही नुकसान झाले. गेल्या वर्षी अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले होते, त्याची नुकसानभारपाईही अनेक शेतकर्यांना अद्याप मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा नव्याने नुकसान झाले आहे.