आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा गांजा पाजला गेलाय : प्रा.देशमुख संगमनेरात सकल हिंदू समाजाचा मोर्चा; बांग्लादेशातील अत्याचारांविरोधात रोष..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बांग्लादेशात आमच्या हजारों माणसांचे शिरकाण झाले, मात्र हिंदू झोपलेलाच आहे. आपण एक झालो तर काय घडू शकते याचे चित्र आपण सगळ्यांनीच बघितले आहे. योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली. आपण जाती-पातीत वाटलो तर, हमखास कापले जाणार आहोत. आज देशाच्या पंतप्रधानांना हे सांगावं लागणार आहे की, बांग्लादेशाचे दोन तुकडे करा आणि त्यातला एक तुकडा भारताला जोडा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 सालीच सांगितले होते, जर या देशाचे दोन तुकडे होणार असतील तर, तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा आणि इकडचे मुसलमान तिकडे पाठवा. मात्र दुर्दैवाने इतिहासाची जाण नसलेली नालायक माणसं सत्तेवर आली आणि या देशाचे वाटोळं झाल्याची घणाघाती टीका पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा.एस.झेड्.देशमुख यांनी केली.


गेल्याकाही महिन्यांपासून बांग्लादेशात सुरु असलेल्या धार्मिक हिंसाचारात कट्टरपंथी मुस्लिमांकडून तेथील हिंदू धर्मियांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. इस्कॉनचे महंत स्वामी चिन्मयानंद यांना तुरुंगात डांबले गेले असून त्यांचे वकिलपत्र घेण्यासही कोणी पुढे यायला तयार नाही. यासर्व गोष्टींचा रोष व्यक्त करण्यासाठी आज देशभरात हिंदुत्त्ववादी संघटनांकडून मोर्चे काढले जात असून संगमनेरातही सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली निषेध मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी प्रा.देशमुख बोल होते. आजच्या मोर्चात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य, आमदार सत्यजीत तांबे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटना व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी पुढे बोलताना प्रा.देशमुख म्हणाले की, फाळणीच्यावेळी जम्मुपासून अवघ्या 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या सियालकोटचा समावेश भारतात करावा की पाकिस्तानात असा विषय समोर आला. त्यावेळी काँग्रेसचे नेते गोगोई यांनी लाखांवर हिंदूंची लोकसंख्या असलेल्या या शहरात मतदान घेवून निर्णय घेण्याचा आग्रह केला. त्याप्रमाणे सियालकोटमध्ये मतदानही घेण्यात आले. मात्र एक लाख दोन हजार इतकी संख्या असलेला हिंदू घरातच बसून राहीला. त्यामुळे 55 हजार अधिक मतं मिळाल्याने या शहराचा पाकिस्तानात समावेश झाला. आज या शहरात अवघे पाचशे हिंदू शिल्लक आहेत. आपण त्यावेळी झोपून राहीलो, मात्र आता जागे होण्याची वेळ आल्याचे सांगत त्यांनी आज जे बांग्लादेशात हिंदू आणि बौद्धांच्या बाबतीत घडत आहे, ती वेळ आपल्यावर येवू द्यायची नसेल तर जाती-पाती नष्ट करुन हिंदू म्हणून एक होण्याची, प्रत्येक मुलाच्या मनात ‘बटेंगे तो कटेंगे’ हे बिंबवण्याची गरज प्रा.देशमुख यांनी व्यक्त केली.


आज लोकसभेत शपथ घेताना पॅलिस्टीन जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. पण हिंदूंचा एकही ** खासदार उभा राहुन त्याचा निषेध करताना दिसतं नाही. ज्या वंदेमातरमचा घोष करुन हजारों क्रांतिकारक फासावर गेले, तो घोष आम्ही देणार नाही असे म्हणणार्‍या माणसांना आपण निवडून देतोय याचा गांभीर्याने विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पाकिस्तानी पत्रकार हसन निसार यांच्या वाक्याची आठवण करुन देतांना प्रा.देशमुख म्हणाले फाळणीनंतर सगळे मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर, पाकिस्तानचा सिरीया आणि भारताचा अमेरिका झाला असता. मात्र दुर्दैवाने आपण इतिहासाच्या साक्षीच तपासल्या नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.


काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधानांवर शेलकी टीका करीत प्रा.देशमुख यांनी मुक्ती मोहंमद सैद यांना देशाचे गृहमंत्रीपद बहाल केल्यानंतर काश्मिर खोर्‍यातील लाखों पंडितांना मालमत्ता सोडून आपल्या आया-बहिणींच्या इभ्रतीसाठी देशात अन्यत्र आश्रय घ्यावा लागल्याचे उदाहरण त्यांनी दिले. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतो, मात्र आपल्याला आडवा येईल त्याला आडवे करण्याचा मंत्र मात्र आपण सोयीस्कर विसरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या लोकांकडे केवळ मतदार म्हणून बघण्याची वृत्ती सोडून त्यांच्याकडे जेव्हा आपण हिंदू म्हणून बघायला सुरुवात करु त्यावेळी आजच्या स्थितीत बदल झाल्याचे बघायला मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.


‘भारताची फाळणी’ या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला देत प्रा.देशमुख म्हणाले की, खरेतर आजच्या शालेय अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश होण्याची गरज आहे. त्यांनी त्यावेळी जी भूमिका मांडली, दुर्दैवाने त्यांच्यानंतर कोणीही त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून तेथील विधानसभेत लावलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र हटवले जात आहे. ज्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 11 वर्ष अंदमानाच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या महान क्रांतिकारकाचे चित्र हटवण्याच्या या निर्णयाचा मात्र कोणीही विरोध करायला तयार नसल्याचे सांगत त्यामागे आपल्या सर्वांना धर्मनिरपेक्षतेचा गांजा पाजला गेल्याची घणाघाती टीकाही प्रा.एस.झेड्.देशमुख यांनी केली.


यावेळी महानुभाव पंथाचे धर्मगुरु, प्रा.डॉ.विजय महाराज भोर यांनी गेल्याकाही महिन्यांपासून बांग्लादेशात सुरु असलेल्या धार्मिक उन्मादावर परखड भाष्य केले. बांग्लादेशाची निम्मी अर्थव्यवस्था भारताच्या व्यापारावर अवलंबून असल्याचे सांगत त्यांनी तेथील आपल्या बांधवांवरील अत्याचार पूर्णतः थांबत नाहीत तो पर्यंत त्यांच्याशी कोणताही व्यवहार करण्यास विरोध केला. यावेळी त्यांनी भारताच्या सहिष्णु इतिहासाचे दाखले देतानाच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी गाजवलेल्या पराक्रमाचे दाखलेही उपस्थितांना दिले. त्यांचे जोशपूर्ण भाषण सुरु असताना उपस्थित शेकडों तरुणांमधून उत्स्फूर्तपणे जयघोष सुरु होता.


या दोघांच्या प्रमुख भाषणानंतर विविध हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देण्यात आले. त्यात बांग्लादेशात सुरु असलेल्या नरसंहाराचा आणि हिंदू भगिनींवर सुरु असलेल्या अत्याचाराचा दाखला देत बांग्लादेशवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करुन तेथील सरकारला वठणीवर आणण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांच्या तीव्र भावना विचारात घेवून त्या सरकार दरबारी पोहोचवणार असल्याचे आश्‍वासन प्रांताधिकार्‍यांनी यावेळी दिले. यानंतर उपस्थितांनी बांग्लादेशच्या राष्ट्रीय झेंड्याला अग्नी देत आपला रोष व्यक्त केला. यावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजीही केली. तत्पूर्वी शास्त्री चौकातून निघालेला मोर्चा मेनरोड, चावडी, मोमीनपूरा मार्गाने प्रशासकीय भवनावर पोहोचला. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. विधान परिषदेचे सदस्य, आमदार सत्यजीत तांबे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री आणि त्यांच्या सर्मथकांच्या उपस्थितीने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या.


सकल हिंदू समाजाने आज आयोजित केलेल्या मोर्चापूर्वीच सोमवारी (ता.9) काँग्रेसच्यावतीने प्रंाताधिकार्‍यांना बांग्लादेश प्रकरणी निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला. त्यासोबतच प्रसिद्धीपत्रकाद्वारे आजच्या मोर्चाला पाठींबा असल्याची घोषणाही करण्यात आली होती. आज प्रत्यक्ष मोर्चात नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री थोरात या देखील आपल्या समर्थकांसह सहभागी झाल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. या विषयावरुन प्रशासकीय भवनाच्या परिसरात विविध चर्चांना उधाण आल्याचे चित्रही यावेळी बघायला मिळाले.

बांग्लादेशाचा झेंडा स्वाहा..

संगमनेर : बांग्लादेशात सुरु असलेल्या हिंदूंवरील हिंसाचाराच्या वाढत्या घटनेने संपूर्ण देशात रोष निर्माण झाला असून आज देशभरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी एकत्रित येत निषेध मोर्चे काढले आहेत. संगमनेरात सकल हिंदू समाज या बॅनरखाली निघालेल्या या मोर्चात सहभागी तरुण अतिशय आवेशात असल्याचे बघायला मिळाले. मोर्चाच्या मार्गावर जागोजागी रांगोळीच्या सहाय्याने बांग्लादेशचा राष्ट्रीय झेंडा काढला गेला होता, त्यावर पाय देवून मोर्चेकरी प्रशासकीय भवनात पोहोचले. येथील निवेदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काही तरुणांनी बांग्लादेशच्या झेंड्याला अग्नी देत त्याला पायदळी तुडवीत आपला राग व्यक्त केला.

Visits: 51 Today: 3 Total: 153551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *