राष्ट्रवादीच्या भूमिकेतून महायुतीमधील खद्खद् चव्हाट्यावर! ‘धोका’ झाल्याचा गंभीर आरोप; भाजपच्या ‘त्या’ सुकाणू सदस्यावर रोष..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने महायुतीमधील सर्वच घटकपक्षातून नाराजीचा सूर उमटत असताना आता राष्ट्रवादीने थेट महायुतीतून बाहेर पडून नगराध्यक्षपदासह दहा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोणी’च्या बैठकीत अंतिम झालेली यादी परस्पर बदलून ‘धोका’ दिला गेल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे. असाच आरोप संगमनेरच्या भाजप-सेनेतील अनेक इच्छुकांनी केला असून सोशल माध्यमातून सुकाणू समितीमधील ‘त्या’ सदस्याच्या व्यंगात्मक नावाचा वापर करुन रोषही व्यक्त केला जात आहे. सुरुवातीपासून शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार निवड प्रक्रिया राबवूनही ऐनवेळी परस्पर ‘गोंधळ’ निर्माण केला गेल्याने मोठा ‘संशय’ निर्माण झाला असून नाराज झालेल्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी वेगळी वाट निवडल्याने महायुतीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपूर्ण घटनाक्रमातून गेल्याकाही दिवसांपासून कानावर येत असलेली महायुतीमधील अंतर्गत खद्खद् राष्ट्रवादीच्या भूमिकेने आता चव्हाट्यावर आली आहे.


तब्बल नऊवर्षांनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले प्राबल्य सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. अशावेळी महायुती व आघाडी धर्माचे काय? यावरुन चर्चा रंगत असताना संगमनेरात सेवा समिती विरुद्ध महायुती अशी लढत होण्याचे चित्र निर्माण होत होते. निवडणुकीचे व्यवस्थापन करण्यात नंबर वन समजल्या जाणार्‍या भाजपने महायुतीला सोबत घेवून तिनही घटकपक्षांसह बैठका घेत सुकाणू समिती स्थापन केली. त्यातून जनाधार मिळावणार्‍या स्वच्छ प्रतिमांचा कथीत शोध घेतला गेला. नगरसेवकपदासह प्रभागनिहाय इच्छुकांच्या प्रत्येकी चार नावांचे लिफाफे वरीष्ठांना पाठवण्यात आले.


दोन दिवसांनी त्यावर ‘लोणी’त मंथन झाले आणि महायुतीमधील सर्व घटकपक्षांच्या पदाधिकार्‍यांनी प्रभागनिहाय उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर एकमत केले. तेथून संगमनेरात येतायेता मात्र काय घडले हे काळच सांगेल, मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांना ताटकळत ठेवण्यात आले. त्यातही प्रत्यक्षात ज्यांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले त्यातील अनेकजण ‘लोणी’च्या बैठकीतील यादीतही नव्हते. सुकाणू समितीमधील ‘त्या’ सदस्याने नेहमीप्रमाणे खिंडीभर वरणावर टांग वर करुन आपला कार्यभार उरकला होता. येथूनच महायुतीतला बेबनाव समोर येवू लागला.


ऐनवेळी जाणीवपूर्वक निश्‍चित उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म टाळण्यात आले, ज्यांना टाळायचे होते, पण सांगता येत नव्हते त्यांना उशिराने एबी दिले गेले. त्यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्जच दाखल केले नाहीत. त्यातून अनेक प्रभागात चर्चेत असलेली नावे मागे पडून नवीनच चेहरे समोर आल्याने महायुतीबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होवू लागले. गेल्या काही वर्षांपासून परिश्रम घेणार्‍यांना टाळले गेल्याने त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी निर्माण होवू लागली. इच्छुकांसह महायुतीमधील घटकपक्षांवरही हा ‘धोका’ प्रभावी ठरला.


त्यामुळेच राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदावरील उमेदवारासह आठ प्रभागांमध्ये दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवताना महायुतीला रामराम ठोकला. राष्ट्रवादीच्या या भूमिकेतून महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये असलेली अंतर्गत खद्खद् चव्हाट्यावर येण्यासह उमेदवारी निश्‍चित मानून असलेल्यांनाही ऐनवेळी डावलले गेल्याने सुकाणू समितीमधील ‘त्या’ सदस्याच्या नावाने बोटं मोडली जावू लागली असून सोशल माध्यमात त्याच्या व्यंगात्मक नावाचा वापर करुन अनेकजण आपला रोष व्यक्त करीत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील घटकपक्षांसह थेट कार्यकर्तेही दुखावले गेल्याने त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर पडण्याची दाट शक्यता आहे.


निवडणुकीच्या नियोजनाचे चाणाक्य समजल्या जाणार्‍या भाजपने सुरुवातीपासूनच निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करुन सुकाणू समिती, प्रभाव, जनमत, सर्व्हे असे वेगवेगळे फिल्टर लावून उमेदवारांच्या नावाची निश्‍चिती ठरवली, त्यानुसार प्रक्रियाही राबवली गेली. महायुतीचे ज्येष्ठनेते, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत सर्व घटकपक्षांच्या एकत्रित बैठकीत 15 प्रभागातील 30 नावेही निश्‍चित झाली व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नावही ठरले. मात्र त्या उपरांतही संगमनेरात येईपर्यंत त्यात परस्पर अनेक बदल झाले आणि भलतीच नावे समोर येवून त्यांच्या नावाने एबी फॉर्म दिले गेले. त्यातून अनेकांचा हिरमोड होवून नाराजी पसरल्याने महायुतीला त्याचा मोठा फटका बसू शकतो.

Visits: 68 Today: 6 Total: 1099793

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *