‘पुणे-नाशिक’ सेमी-हायस्पीड रेल्वे प्रस्तावित मार्गानेच! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती; सुधारित आराखडा अंतिम टप्प्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ‘ड्रिम प्रोजेक्ट’ ठरलेला ‘पुणे-नाशिक’ हा देशातील पहिला सेमी-हायस्पीड रेल्वेमार्ग गेल्याकाही वर्षात अडथळ्यांच्या शर्यतीत अडकला आहे. त्यातच नारायणगाव जवळील मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोपला या रेल्वेमार्गामुळे बाधा निर्माण होण्याची शक्यता समोर आल्याने गेल्या वर्षभरापासून वेगात सुरु असलेले भूसंपादनाचे कामही बंद करण्यात आले होते. त्यातून मध्यंतरी हा रेल्वेमार्ग चाकण-खेडपासून शिर्डीकडे वळवण्याच्या चर्चाही समोर आल्याने अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठी नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी शुक्रवारी (ता.6) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली असता रेल्वेमंत्र्यांनी हा रेल्वेमार्ग प्रस्तावित मार्गानेच नेला जाणार असल्याची ग्वाही दिली. या शिवाय खोडद येथील रेडिओ दुर्बिणीला अडथळा निर्माण होवू नये यासाठी या केंद्राला वळसा घालून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून त्याचा सुधारित आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे गेल्या तीन दशकांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत गुरफटलेल्या या बहुप्रतिक्षीत रेल्वेमार्गासाठी यंदाच्या केंद्रीय बजेटमध्ये घसघशीत तरतुद होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या तीन दशकांपासून मागणी होत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गात गेल्याकाही वर्षात वेगवेगळे अडथळे निर्माण होत असल्याने हा रेल्वेमार्ग रखडला आहे. त्यातच पूर्वी व्हाया संगमनेर प्रस्तावित असलेल्या या मार्गात नारायणगावजवळील ‘जीएमआरटी’ आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सद्वारा चालवली जाणारी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ दुर्बिणी) असलेल्या संवेदनशिल ठिकाणातून प्रस्तावित रेल्वेमार्ग जात असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आल्यानंतर या प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले होते. याबाबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी नव्याने सुधारित आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी मान्यता दिली. नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिणींच्या प्रकल्पाला कोणताही अडथळा निर्माण होवू नये यासाठी या प्रकल्पाला वळसा घालून नवा आराखडा तयार केला जाणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या चर्चेत दिली होती.
त्याच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी (ता.6) खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत पुणे-नाशिक रेल्वेमार्गाकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी चालू पंचवार्षिकमध्ये देशाला विकसित भारत म्हणून वाटचाल करायची आहे. त्यामुळे हा प्रकल्प देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांना दिले. त्यामुळे व्हाया संगमनेर की शिर्डी हा संभ्रम आता दूर झाला असून सदरील प्रकल्प प्रस्तावित मार्गानेच जाणार असून त्यात केवळ नारायणगावजवळील खोडदला वळसा घातला जाणार आहे. त्यामुळे 232 किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित मार्गाचे अंतर 60 ते 90 किलामीटर वाढण्याची शक्यता असून पूर्वीच्या निर्धारीत दोन तासांच्या प्रवासाचे अंतरही आता तासाभराने वाढण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि पुणे जिल्ह्यातील आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव या दुष्काळी भागातून प्रस्तावित असलेल्या या रेल्वेमार्गामुळे या तिनही जिल्ह्यातील अविकसित तालुक्यांमध्ये समृद्धी येण्याची आशा आहे. या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून पुणे, भोसरी, चाकण व सिन्नर औद्यौगिक वसाहतीही जोडल्या जाणार असल्याने त्याचा फायदा उद्योजकांसह बेरोजगारांनाही मोठ्या प्रमाणात होणार आहे. याशिवाय या रेल्वेमार्गावर ठिकठिकाणी शीतगृहांचीही निर्मिती प्रस्तावित असल्याने या तिनही जिल्ह्यातील शेतकर्यांना आपली शेती उत्पादने महानगरांमध्ये पोहोचवणे सहज शक्य होईल. त्यामुळे या रेल्वेमार्गाकडे तीन जिल्ह्यातील पारंपरिक दुष्काळी तालुक्यांचे लक्ष खिळले होते, ते आता पूर्णत्त्वास जाण्याची शक्यता आहे.
पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेप्रकल्प माझ्यासाठी महत्वाचा आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन मार्गात येणार्या अडचणी दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आता नव्याने तयार करण्यात येत असलेला सुधारित आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होवून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळावी व त्यासाठी भरीव निधीची तरतुद व्हावी यासाठी आपण रेल्वेमंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील विनंती करणार आहोत.
राजाभाऊ वाजे
खासदार, नाशिक