दिवाळीतील हलगर्जीपणा ‘अखेर’ भोवलाच..! संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज झाली अर्धशतकीय वाढ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीतील हलगर्जीपणा अखेर संगमनेरकरांना भोवला असून तालुक्याच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील बाधितांची संख्या चढाला लागली असून आजही चढतीचा क्रम कायम राहील्याने हा महिना सुरुवातीला दिलासा, तर नंतर धक्का देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आजही खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या निष्कर्षातून 50 रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील अठरा रुग्णांचा समावेश असून उर्वरीत 32 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत सलग तिसर्‍या दिवशी वाढीव रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या आता 48 व्या शतकाच्या उंबरठ्यावर 4 हजार 796 वर पोहोचली आहे.


दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी होणार याचा पूर्वअंदाज असल्याने शासनाने दुकानदार आणि ग्राहक अशा दोहींसाठी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानुसार संगमनेरातील बहुतेक दुकानदारांनी व्यवस्थाही केल्या होत्या. मात्र रस्त्यावरील गर्दी, फेरी विक्रेत्यांचा गोतावळा आणि कहर म्हणजे ‘अमरत्त्व’ प्राप्त झाल्यागत अनेकांचा बिनधास्त वावर यामुळे दिवाळीनंतर कोविडचा संसर्ग वाढणार हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची गरजच नव्हती, त्याचे परिणाम आता दिवाळीच्याच आठवड्यात समोर येत असल्याने शासन, प्रशासन आणि नागरिक अशा तिघांच्याही चिंतेत निश्‍चितच भर पडली आहे.

आज शहरातील स्वामी समर्थ नगर परिसरात राहणाऱ्या 47 वर्षीय इसमासह इंदिरानगर परिसरातील 46, 33, 21 व 17 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी रोड परिसरातील 50 वर्षीय इसमासह 65 व 35 वर्षीय महिला, विद्यानगर परिसरातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 वर्षीय तरुण, 58 व 28 वर्षीय महिला, नवीन नगर रोड वरील 47 वर्षीय महिला, गांधी चौक परिसरातील 70 व 45 वर्षीय इसमासह 65 वर्षीय महिला, देवाचा मळा परिसरातील 60 वर्षीय जेष्ठ नागरिक आणि केवळ संगमनेर असा पत्ता दिलेला 29 वर्षीय तरुण अशा शहरातील एकूण 18 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात रुग्ण वाढीतील चढ-उतार आजही कायम असून बुधवारी 31 रुग्ण समोर आल्यानंतर आज त्यात एकाची भर पडली. आजही यापूर्वी बाधित आढळलेल्या गावांसह कोविड मुक्त झालेल्या गावांमधूनही पुन्हा रुग्ण समोर आले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोल्हेवाडी येथील 33 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 42 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथील 40 व 32 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 13 वर्षीय बालिका, रहिमपूर येथील 50 वर्षीय इसम, उंबरी बाळापूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40, 38 व 16 वर्षीय तरुण, कोंंची येथील 30 वर्षीय तरुण, प्रतापपुर येथील 31 वर्षीय तरुण,

जोर्वे येथील 70 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 60 व 48 वर्षीय इसमासह 52, 45 वर्षीय दोघी व 21 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 63 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 63 वर्षीय इसमासह 57 व 47 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 52 व 45 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, दाढ बुद्रुक येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमज येथील 30 वर्षीय तरुण, आणि पिंपळगाव कोंझिरा येथे 82 व 52 वर्षीय महिला अशा ग्रामीण भागातील एकूण 32 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या बाधित संख्येत 50 रुग्णांची भर पडून तालुका 48 व्या शतकाच्या उंबरठ्यावर चार हजार 796 वर पोहोचला आहे.

Visits: 224 Today: 4 Total: 1107619

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *