उपविभागातील पाचशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई गणेशोत्सवाची पार्श्वभूमी; पोलिसांकडून कारवाईला सुरुवात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचा लोकोत्सव समजल्या जाणार्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने संगमनेर व अकोले तालुक्यातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दितील गुन्हेगारी प्रवृत्तींवर धाक निर्माण केला जात असून संगमनेर शहरातील 86 जणांसह उपविभागातील एकूण 469 जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, गुन्हेगारी प्रक्रिया कलम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. यासाठी उपविभागातील सहाही पोलीस ठाण्यांकडून एकूण 646 जणांवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता अशी माहिती संगमनेरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांनी दिली.
गेल्या 7 सप्टेंबरपासून राज्यभरासह संगमनेर व अकोले तालुक्यात गणेशोत्सवाची मोठी धूम बघायला मिळत आहे. दहा दिवस चालणार्या या उत्सवाची मंगळवारी (ता.17) सांगता होणार आहे. यंदाच्या वर्षी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित खासगी 14, बाल मंडळांचे सहा, सार्वजनिक गणेश मंडळांचे 49 आणि एक गांव एक गणपती दहा अशा एकूण 79 ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याशिवाय संगमनेर तालुका पोलिसांच्या हद्दित दोन खासगी, 36 बाल मंडळे, 25 मोठी मंडळे आणि 27 ठिकाणी एक गांव एक गणपती असे 90, घारगाव पोलिसांच्या हद्दित पाच खासगी, 28 बाल मंडळे, 14 मोठी मंडळे, बारा ठिकाणी एक गांव एक गणपती असे 54, आश्वीत दोन खासगी, 20 बाल, 15 मोठी व तीन एक गांव एक गणपती अशी एकूण 40,
तर, अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दित पाच खासगी, 35 बाल मंडळे, 60 सार्वजनिक मोठी मंडळे व 15 ठिकाणी एक गांव एक गणपती आणि राजूर पोलिसांच्या हद्दित आठ खासगी, सहा बाल मंडळे, 19 मोठी मंडळे आणि 52 गावांमध्ये एक गणपती अशा एकूण 85 गणेश मंडळांनी अर्ज दाखल केले आहेत. यावर्षी संगमनेर तालुक्यातील 52 तर, अकोले तालुक्यातील 67 अशा एकूण 119 गावांमध्ये प्रत्येकी एकाच सार्वजनिक मंडळात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून भजन-कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. तर, सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे आजपासून (ता.14) पाहण्यासाठी खुले होणार आहेत.
मंगळवारी (ता.17) महाराष्ट्रात सर्वत्र साजर्या होणार्या या उत्सवाची सांगता होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. विसर्जनदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विसर्जनाच्या स्थळावरील नियोजनासह या दरम्यान कोणत्याही गुन्हेगारी घटना घडू नयेत यासाठी पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर यांच्या आदेशान्वये उपविभागातील सहाही पोलीस ठाण्यांच्या हद्दितील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलिसांनी सादर केलेल्या 129 पैकी 86, तालुका पोलिसांच्या हद्दितील 154 पैकी 89, घारगाव पोलिसांच्या 74 पैकी 72 व आश्वी पोलिसांच्या 70 पैकी 42 अशा संगमनेर तालुक्यातील एकूण 289 जणांवर,
तर, अकोले पोलिसांच्या हद्दितील 166 पैकी 137 आणि राजूर पोलिसांच्या हद्दितील 57 पैकी 43 अशा 180 जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, गुन्हेगारी प्रक्रिया कलम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तातही मोठी वाढ करण्यात आली असून स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाचे आणि गृहरक्षक दलाचे जवानही तैनात आले आहेत. विसर्जना दरम्यान वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.