‘अमृत जवान सन्मान अभियान’साठी विशेष गुगल फॉर्म ः डॉ. मंगरुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील आजी-माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘अमृत जवान सन्मान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे विविध प्रश्न व समस्यांचा निपटारा केला जाणार आहे. संगमनेर, अकोले तालुक्यासाठी विशेष गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे, अशी माहिती संगमनेर भागाचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी दिली.
संगमनेर शहरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात मंगळवारी (ता.8) अभियानाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ पाटील, उत्तर महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष रायभान पवार, अहमदनगर जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष भिकाजी भागवत आदी उपस्थित होते.
7 फेब्रुवारी ते 23 एप्रिल असे 75 दिवस हे अभियान राबविण्यात येत आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्यातील महसूल, पोलीस, कृषी, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, सहकार, भूमी अभिलेख आदी विभागांकडील कामे या अभियानाच्या माध्यमातून विशेष प्राधान्याने निर्गत केली जाणार आहेत. दररोज त्याचा आढावा घेण्यात येणार आहे, असेही डॉ. मंगरुळे यांनी सांगितले. यावेळी स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे संस्थापक भानुदास पोखरकर, अध्यक्ष प्रकाश कोटकर, उपाध्यक्ष सुभाष कुडेकर, सचिव प्रवीण गुंजाळ, कार्याध्यक्ष सुनील थोरात, खजिनदार अर्जुन कोल्हे, सहसचिव संतोष आहेर, सहखजिनदार आनंदा गिते, सदस्य भारत कुटे, प्रकाश काशिद, बाळासाहेब आंधळे, संदीप दिघे, रोहिणी कोटकर, विक्रम थोरात तसेच सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष संदीप गुंजाळ, उपाध्यक्ष भीमराज काकड, सचिव संजय रहाणे, कार्याध्यक्ष विजय खजिनदार देविदास खामकर, खताळ, सहखजिनदार शिवाजी कुदळ, प्रकाश पवार, संतोष पोखरकर, सतीष खताळ, नितीन शिंदे, बाळासाहेब ढगे, अशोक गडाख, शिवाजी रहाणे, वीरपत्नी शकुंतला जाधव आदी उपस्थित होते.