सिन्नरजवळील भिषण अपघातात संगमनेरातील माय-लेकराचा दुर्दैवी मृत्यू! कष्टकरी कुटुंबावर काळाचा घाला; हृदयद्रावक घटनेने साईनगर परिसरासह संपूर्ण संगमनेर हळहळले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नातेवाईक असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी घोटीला निघालेल्या संगमनेरातील मायलेकाचा सिन्नरनजीक झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. अत्यंत मनमिळाऊ आणि धार्मिक प्रवृत्तीच्या कुटुंबावर एकाचवेळी दुहेरी घाला आल्याने या कष्टकरी कुटुंबावर डोंगरच कोसळला आहे. सदरची घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दित घोटी महामार्गावर घडली. इनोव्हा कारला दुचाकीची जोराची धडक बसल्याने सदरचा अपघात झाला, व दुचाकीवरील मायलेकाचा मृत्यू झाला. दोघांनाही जखमी अवस्थेत सुरुवातीला नाशिकला नेण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त नसल्याने सिन्नर पोलीस ठाण्यात अद्याप घटनेची नोंद झालेली नाही. मन हेलावणार्‍या या घटनेने संपूर्ण साईनगर परिसरात शोक पसरला आहे. दोघांवर संगमनेरच्या अमरधामध्ये अंत्यसंस्कार सुरु आहेत.

कष्टकरी स्वभावाचा पारंपारिक वारसा असलेल्या विश्वनाथ पवार (सुतार) यांना दोन मुलं. दोघांचीही लग्नकार्य उरकल्यानंतर नऊ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर कौटुंबिक अडचणीतून मोठा मुलगा आपल्या कबील्यासह देवाच्या मळ्यात रहाण्यास गेला तर, छोटा अमोल साईनगरमध्येच आई, पत्नी व मुलासह रहात होता. कष्ट करुन जगण्याचा वारसा असल्याने मोठ्याने फर्निचरच्या दुकानात तर लहान्याने मालपाणी उद्योग समूहात चाकरी स्विकारली होती. अमोलला दहा वर्षांचा मुलगा आहे, तो सध्या पाचवीत शिकतोय.

घोटी येथील रुग्णालयायात त्यांचा कोणी नातेवाईक दाखल असल्याने त्याला भेटण्याचा आग्रह अमोलची आई शंकुतलाबाई (वय 55) यांनी केला. अमोलला आज सुट्टी असल्याने दोघेही दुपारी त्याच्या दुचाकीवरुन घोटीकडे जायला निघाले होते. सिन्नरपासून काही अंतर घोटीकडे जातांना त्यांच्या दुचाकीची आणि एका इनोव्हा कारची जोरदार धडक झाली. त्यात दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला होता. अशा अवस्थेत त्यांना नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र श्वासांशी सुरु असलेल्या लढाईत या दोघाही माय लेकरांना अपयश आलं आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अत्यंत प्रामाणिक, कष्टकरी, धार्मिक आणि मनमिळाऊ कुटुंब म्हणून संपूर्ण साईनगर परिसरात विश्वनाथ पवार (सुतार) यांच्या कुटुंबाची ओळख होती. सगळेकाही सुखासमाधानाने सुरु असतांना काळाने अचानक घाव घालून पवार कुटुंबावर मोठा आघात केला आहे. हे दुर्दैवी वृत्त संगमनेरात येवून धडकताच अमोलचा मित्र परिवार. संपूर्ण साईनगरमधील अबालवृद्धांनी त्याच्या घरी गर्दी केली होती. रात्री साडे आठच्या सुमारास या माय लेकरांचे पार्थिव संगमनेरात आणण्यात आले. रात्री दहा वाजता दोघांवरही संगमनेरच्या अमरधामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Visits: 5 Today: 1 Total: 20129

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *