साकूरचे वीरभद्र कृषी सेवा केंद्र आगीत भस्मसात! शॉर्टसर्किट झाल्याचा संशय; पन्नास लाखांचा मुद्देमाल स्वाहा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारभागाची समृद्ध बाजारपेठ म्हणून लौकीक असलेल्या साकूर मध्ये शुक्रवारी रात्री एका कृषी सेवा केंद्राला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. खांबावरुन आलेल्या सर्व्हिस लाईनमध्ये स्पार्किंग होवून सदरची आग लागल्याचा दावा करण्यात आला आहे. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी स्थानी ग्रामपंचायतीच्या टँकरद्वारा आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी काहींनी संगमनेर नगर परिषदेसह थारोत कारखान्याच्या अग्निशामक बंबांनाही पाचारण केले, मात्र तो पर्यंत आगीच्या ज्वाळांनी पंकज खेमनर यांच्या वीरभद्र कृषी सेवा केंद्राची राख करुन टाकली होती. या घटनेनंतर वीज कंपनीचे अधिकारी तत्काळ हजर होणं अपेक्षित असताना धटनेनंतर तब्बल 12 तासांनी आज सकाळी त्यांनी जळीत दुकानाची पाहणी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवारी (ता.13) साकूरमधील संगमनेर रस्त्यावर असलेल्या वीरभद्र कृषी सेवा केंद्रात घडली. या दुकानाचे मालक पंकज खेमनर नेहमीप्रमाणे रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर तासाभरातच सदरचा प्रकार घडला. दुकानाच्या बंद शटरमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर निघत असल्याचे पाहून काहींनी खेमनर यांना कळवले. त्यांनी तत्काळ दुकानात येवून पाहिले असता तो पर्यंत आगीने संपूर्ण दुकान आपल्या कवेत घेतले होते. या दरम्यान ग्रामपंचायतीचा टँकरही तेथे आल्याने तरुणांनी पुढाकार घेत पाण्याचा फवारा करुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला.
या दरम्यान संगमनेर नगर परिषद व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचा अग्निशामक बंबही तेथे पोहोचला, मात्र तत्पूर्वीच स्थानिकांनी टँकरच्या पाण्याचा वापर करुन आगी आटोक्यात आणली होती. सदरची आग वीज कंपनीच्या खांबावरुन दुकानात घेतलेल्या सर्व्हिस लाईनपासून सुरु होवून ती दुकानात पोहोचल्याचा व त्यानंतर दुकानातील कृषी साहित्यापर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. या जळीत प्रकरणात दुकानातील सुमारे 40 लाखांहून अधिक रुपयांचे कृषी साहित्य, खतांच्या गोण्या, फर्निचर, संगणक व अन्य सामान असे एकूण 50 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच घारगावचे पोलीस निरीक्षक अनिल भदाणे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कर्मचारी सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर यांनी तत्काळ साकूरमध्ये धाव घेतली. या घटनेची नोंद करण्यात आली असून आज सकाळी वीज कंपनीचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.