संगमनेरच्या गावठाणात ‘त्या’ तिघींची दहशत! मॉर्निंग वॉकला जाणार्यांची घरे लक्ष्य; भल्या पहाटे सुरु होतो खेळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चोरी करणारे चोरटे वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या वापरुन आपले इप्सित साधीत असल्याचे प्रकार नेहमीच समोर येत असतात. त्यात बंद घराचे टाळे तोडून, खिडकीचे गज उचकटून किंवा थेट हत्याराच्या धाकाने दरवाजा तोडून चोर्या झाल्याची विविध प्रकरणं रोजच समोर येत असतात. मात्र या सगळ्या पद्धतींना फाटा देत संगमनेर शहरात अचानक अवतरलेल्या तिघींनी अवघ्या आठच दिवसांत गावठाणात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पाळत ठेवून अगदी भल्या पहाटे थेट घरात प्रवेश करुन या तिघीही अगदी पद्धतशीरपणे हेरलेल्या सावजाचे घर खाली करीत आहेत. गेल्याकाही दिवसांत शहरातील विविध भागात एकामागून एक घडलेल्या अशा प्रकारांमध्ये ‘त्या’ तिघीच असल्याचेही सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संगमनेरात पहिल्यांदाच महिला चोरांची दहशत निर्माण झाली असून निरोगी जीवनाच्या आशेने घराचा दरवाजा लोटून मॉर्निंग वॉकला जाणार्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहराच्या अवतीभोवती असलेल्या मोकळ्या जागा, प्रवरा आणि म्हाळुंगी नद्यांच्या गाळपेर जमिनी यावर इमले उभे करून वास्तव्य करणार्या महिला व लहान मुलांकडून शहरात फिरून प्लास्टिकचा कचरा आणि कागद गोळा करण्याचा प्रकार नेहमीच दिसून येतो. उन्हात फिरुन परिश्रमाने जमा होणारा हा भंगार माल सायंकाळच्या वेळेस भंगार विक्रेत्याला विकून त्यातून संध्याकाळची भाकरी मिळवण्याची त्यांची ही धडपड त्यांच्या जीवनाचा संघर्ष आहे. मात्र गेल्या काही दिवसात प्लास्टिक आणि कचरा गोळा करताकरता या जमातीमध्ये चोरट्यांचाच अधिक भरणा झाल्याचे आता प्रकर्षाने दिसू लागले आहे.
त्यातही सध्या संगमनेर शहराच्या गावठाण हद्दीत एका धष्टपुष्ट महिलेसह अन्य दोन महिलांनी तर मोठी दहशत निर्माण केली आहे. पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास या तिघीही भल्या मोठ्या रिकाम्या गोण्या घेऊन गावठाणातील रस्त्यारस्त्यावर आणि बोळांमध्ये फिरुन सावज हेरतात. भल्या पहाटे निरोगी जीवनासाठी म्हणून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणार्यांना लक्ष करुन या महिला पहाटेच्या वेळेस लोटून ठेवलेल्या घराच्या दरवाजातून थेट आंत प्रवेश करुन जे हाताला लागेल ते सोबतच्या गोण्यांमध्ये भरुन अतिशय पद्धतशीरपणे पसार होत आहेत. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असलेल्या या प्रकारातून गेल्या अवघ्या आठच दिवसात गावठाणातील जवळपास अर्धा डझनहून अधिक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

मेनरोड, बाजारपेठ, रंगारगल्ली, चव्हाणपुरा, चंद्रशेखर चौक अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून समोर आलेल्या एकामागून एक घटना या महिलांची दहशत दाखवण्यास पुरेशा आहेत. ऐन पहाटेच्या वेळेला फिरण्यासाठी घराबाहेर पडणार्यांशिवाय घरातील अन्य मंडळी पहाटेच्या गारव्यात साखर झोपेत असल्याने या तिघींकडून संपूर्ण घरात झाडू मारला जात असूनही त्याची कोणालाही खबर लागत नाही. यातून माजी नगराध्यक्ष स्व. राधावल्लभ कासट यांचे घरही सुटले नाही. त्यांच्याही घरातून या तिघींनी भल्या सकाळी संगणक, वेगवेगळ्या प्रकारचे गृहपयोगी सामान, मिक्सर ग्राइंडर अशा अनेक गोष्टी अक्षरशः पोत्यांमध्ये भरुन डोक्यावरून वाहून नेल्या. विशेष म्हणजे हा प्रकार घडत असताना रस्त्यावरून पायी जाणार्या येणार्यांची तुरळक वर्दळही असल्याचे दिसून येते. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना देण्यात आले आहे, मात्र त्यानंतरही या तिघींच्या दहशतीत कोणताही फरक पडलेला नाही.

चोर्या, घरफोड्यांसह बस स्थानकावरुन गंठण लांबविण्याचे प्रकार, भुरट्या चोर्या यात सातत्य कायम असताना आता संगमनेर शहराच्या गावठाण भागात भल्या पहाटे तीन बलदंड महिला थेट घरांमध्ये घुसून घरातील गृहपयोगी वस्तू व मौल्यवान ऐवज पोत्यात भरुन चोरुन नेवू लागल्याने संगमनेरकरांमध्ये या तिघींनी मोठी दहशत निर्माण केली आहे. पोलिसांनी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरुन या तिघींचाही शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. या महिला कोण आहेत, त्या कोठून आल्या आहेत याचाही तपास लागण्याची गरज आहे.

