खासगी मदतनीस झाला आंबीचा तलाठी! मुळेवर दररोज दरोडा; बायकोच्या खात्यात हप्त्यांचा पैसा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही वर्षांपासून पाठोपाठ वृत्तांची अखंड श्रृंखला जोपासणार्या संगमनेर तालुक्यातील पठार भागातून आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या प्रकरणात आंबी खालसा येथील तलाठी कार्यालयात कार्यरत असलेला मदतनीसच वाळू तस्करांची टोळी चालवित असल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून मिळालेल्या हप्त्यांची रक्कम चक्क त्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर ‘ऑनलाईन’ पद्धतीने जमा केली जात आहे. धक्कादायक म्हणजे वाळू उपशाबाबत स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर आंबी खालसाच्या तलाठ्यांकडून रात्री-अपरात्री तक्रारदारालाच ‘लोकेशन’ पाठवण्याचा आग्रह धरला जातो. त्या दरम्यान ‘तो’ मदतनीस तस्करांना सावध करीत असल्याचेही समोर आले आहे. तलाठ्यांकडून ‘खासगी’ माणसं ठेवून सुरु असलेली गौणखनिजाची ही लुट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘आदर्श’ वाळू धोरणाला हरताळ फासणारी असून तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शुक्रवारी (ता.17) रात्री अकराच्या सुमारास पठारभागातील आंबी खालसा, तांगडी व कोठे परिसरातील मुळा नदीपात्रातून जेसीबीच्या मदतीने बेसुमार वाळू उपसा सुरु असल्याची तक्रार एका स्थानिकाने आंबी खालसाचे तलाठी बाबासाहेब नरवडे यांच्याकडे केली होती. त्यावर तत्काळ कारवाई करण्याऐवजी तलाठी महाशयांनी संबंधित तक्रारदारालाच वाळू उपसा सुरु असलेल्या ठिकाणचे ‘लोकेशन’ टाकण्यास सांगितले. त्यावर तक्रारदाराने इतक्या रात्री मी जावे का लोकेशनवर? असा प्रतिसवाल तलाठ्याला केला असता त्यांनीही चक्क ‘हो’ असे प्रत्त्यूत्तर त्याला दिले. त्यानंतर तक्रारदार वाळू उपसा सुरु असलेल्या ठिकाणी गेला असता तो येण्यापूर्वीच पात्रातील सर्व वाळू तस्कर आपल्या वाहनांसह अचानक ‘गायब’ झाल्याचे त्याला दिसून आले. मात्र त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ओरबाडलेल्या नदीपात्रातील जखमा तशाच शिल्लक होत्या.
नियमानुसार किमान दुसर्या दिवशी (ता.18) संबंधित तलाठ्याने ‘त्या’ ठिकाणी जावून उपसा झालेल्या ठिकाणाचा पंचनामा करण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर आज सोमवार उजेडला तरीही आंबी खालसाच्या तलाठ्यांना त्यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला वाळू तस्करांचा अड्डा अद्याप गवसलेला नाही. यावरुन आंबी खालसाचे तलाठीच आपल्या खासगी मदतनीसाचा वापर करुन अहोरात्र मुळानदीचे लचके तोडीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
धक्कादायक म्हणजे आंबी खालसा येथील तलाठ्याने आपल्या मदतीसाठी ठेवलाला हा ‘झीरो तलाठी’ वाळू चोरांच्या टोळीचा वापर करुन स्वतःच आंबी खालसाच्या नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी करीत असल्याची चर्चा आहे. त्याने ठरवून घेतलेल्या नदीपात्राच्या परिसरात पठारावरील अन्य कोणत्याही वाळू तस्कराला वाळू उचलण्याची अथवा टाकण्याची मूभा नाही हे विशेष. आंबीसह तांगडी व कोठे परिसरातून वाळू तस्करांच्या टोळ्यांना सहज वाळू उपसा करुन त्याची वाहतूक करता यावी यासाठी स्थानिक शेतकर्यांचा विरोध झुगारुन जेसीबीच्या मदतीने रस्तेही तयार करण्यात आले आहेत.
गेल्याकाही वर्षांपासून आंबी खालसा तलाठ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या खासगी मदतनीसाने वाळू तस्करीच्या माध्यमातून मोठी माया गोळा केली आहे. मुळानदीचे लचके तोडून त्याने आंबी खालसामध्येच आधुनिक गोठाही उभारला असून त्यासाठी वापरण्यात आलेला बेसुमार मुरुमही त्याने बेकायदा उपसून आणला होता. कहर म्हणजे हा मदतनीस आंबी खालसा, तांगडी व कोठे परिसरातून वाळू चोरी करणार्या सर्वच वाळू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली करीत असून चक्क त्यातील काही जणांकडून त्याने ‘ऑनलाईन’ पद्धतीने आपल्या बायकोच्या बँक खात्यावर हप्त्यांची रक्कम स्वीकारल्याचेही पुरावे उपलब्ध आहेत.
त्यातही धक्कादायक म्हणजे याच मदतनीसाने ‘कोतवाल’ भरतीसाठीही अर्ज केला असून त्याची निवड होण्यासाठी आंबी खालसाचे कामगार तलाठी बाबासाहेब नरवडे जीवाचे रान करीत आहेत. संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून संबंधित तलाठी व त्याचा खासगी मदतनीस या दोघांचीही सखोल चौकशी करण्याची गरज असून शासन व पर्यावरणाचे लाखों रुपयांचे नुकसान करणार्या या दोघांवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
आंबी खालसाचे तलाठी बाबासाहेब नरवडे यांच्या खासगी मदतनीसाने दोन वर्षापूर्वी अवकाळी पावसाने झालेल्या फळबागांच्या नुकसानीतही शासनाला लाखों रुपयांचा चुना लावल्याची जोरदार चर्चा सध्या पठारभागात सुरु आहे. त्यावेळी या भामट्याने चक्क गिन्नीगवताच्या रानाला फळबागा दाखवून लाभार्थ्यांकडून निम्म्याला निम्मा वाटा घेतल्याचे बोलले जात आहे. तलाठी आणि त्याचा मदतनीस यांच्या संगनमताने सुरु असलेला हा प्रकार म्हणजे पर्यावरणासह शासनाच्या तिजोरीवरही दरोडा असून त्याची ‘एसीबी’ मार्फत सखोल चौकशी होवून दोघांवरही कठोर कारवाईची आवश्यकता आहे.