संगमनेरच्या वेशीवर ‘लव्ह जिहाद’ची धडक! अल्पवयीन मुलीसह झाला बेपत्ता; पोलिसांनी तीन दिवसांत आवळल्या मुसक्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपली मूळ ओळख लपवून मुलींना फूस लावून पळवून नंतर त्यांचे धर्मांतरण करण्याचे प्रकार देशाच्या विविध भागात घडत असताना अशाच एका घटनेने आता थेट संगमनेरच्या वेशीवरच धडक दिली आहे. या घटनेत संगमनेर शहर पोलिसांच्या कार्यतत्परतेमूळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त होण्यापूर्वीच तिची सुटका करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा निवासी असून पीडित मुलीच्या वयाहून दुपटीने मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमातून पीडितेला जाळ्यात ओढीत त्याने थेट संगमनेरात येवून तिचे अपहरण केले. त्यानंतर बसने मुंबईत नेवून तिच्यावर दोनवेळा अत्याचार करीत धर्मांतरण करण्याचाही प्रयत्न केला. या दरम्यान तो विवाहित असल्याचे व त्याला तब्बल चार अपत्य असल्याचेही पीडितेला समजले. आरोपी तिला घेवून मुंबईतून पसार होण्याच्या तयारीत असतानाच संगमनेर पोलिसांनी छापा घालून पीडितेची सुटका करताना आरोपी अमीर रेहान मलिक याच्या मुसक्या आवळल्या. संगमनेरच्या न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना पालकांची चिंता वाढवणारी असून सोशल माध्यमातून कशापद्धतीने मुलींना जाळ्यात ओढले जाते याचे वास्तव दर्शन घडवणारी आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घुलेवाडीतील एका वसतीगृहात राहणार्‍या 17 वर्ष 6 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत 2 मार्च रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांना तपासाचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी सदरील विद्यार्थीनीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंकडे विचारपूस करीत तत्काळ तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्‍लेषणावरुन वसतीगृहातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या इसमाची ओळख अमीर रेहान मलिक अशी समोर आल्यानंतर पोलिसांना घटनेचे गांभीर्य समजले आणि त्यांनी विविध पथके स्थापन करुन आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.


दरम्यानच्या कालावधीत आरोपी नवी मुंबईच्या परिसरात असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. मात्र त्या ठिकाणी तत्काळ पोहोचणे अशक्य असल्याने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या संबंधांना उजाळा देत खबर्‍यांचे नेटवर्क कार्यरत केले. त्यातून आरोपी नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे समजताच उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक इम्रान खान, हवालदार अशोक पारधी आणि पोलीस शिपाई शशीकांत दाभाडे यांना खासगी वाहनातून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून तपासकामात त्यांचेही सहकार्य घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे अपहृत मुलीची सुखरुप सुटका होण्याच्या आशाही अधिक प्रबळ झाल्या.


सोमवारी (ता.4) पहाटे संगमनेरातून मुंबईकडे गेलेले पथक महानगराच्या वेशीवर पोहोचताच अपहरणकर्ता पीडितेसह मुंब्रा परिसरातील शिळ डायघरमधील पत्राचाळ भागात गेल्याची माहिती उपअधीक्षक वाघचौरेंना मिळाली. याबाबत त्यांनी डायघर पोलिसांना सतर्क करीत मुंबईत गेलेल्या संगमनेरच्या पोलीस पथकाला डायघर पोलीस ठाण्यात जाण्याची सूचना केली. पूर्वसूचना मिळालेल्या डायघर पोलिसांनीही संगमनेरचे पथक पोहोचताच त्यांच्यासह पत्राचाळीतील एका इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या खोलीवर छापा घातला. यावेळी खोलीत संगमनेरातून अपहरण करुन नेलेल्या अल्पवयीन मुलीसह आरोपी अमीर मलिकही आढळून आला. त्या दोघांनाही ताब्यात घेत कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन सोमवारी रात्री उशिराने पोलीस पथक संगमनेरात परतले.


मंगळवारी पीडितेची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर तिचा जवाब नोंदविण्यात आला. त्यानुसार सुमारे महिन्याभरापूर्वी सोशल माध्यमातील ‘फेसबुक’ या प्लॅटफॉर्मवर पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. एकमेकांची ओळख करुन देताना आरोपीने आपले नाव अमीर रेहान मलिक असे असल्याचे व आपण उत्तर प्रदेशातील असून इंजिनिअर असल्याचे आणि सध्या मुंबईत ‘दुकानात’ काम करीत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी त्याने आपण मुस्लिम नसल्याचेही पीडितेला पटवून दिले होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये फेसबुकवर चॅटींग सुरु झाले. काही दिवसांनी आरोपीने आपला मोबाईल क्रमांक शेअर करुन त्यावर फोन करण्याचा आग्रह सुरु केला. मात्र पीडितेने त्यास नकार दिला, त्यामुळे तो वारंवार पीडितेला विनवण्या करु लागला.


त्याच्या याच प्रयत्नात ‘ती’ मुलगी फसली आणि तिने त्याला फोन केला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी तो तिला फोन करुन तिच्या विवस्त्र छायाचित्रांसाठी आग्रह धरु लागला. मात्र यावेळीही पीडितेने त्याला स्पष्ट नकार दिला. आपल्या मनासारखे घडत नसल्याचे पाहुन आरोपी संतापला व त्याने; ‘जर तु मला तुझे विवस्त्र फोटो पाठवले नाहीत तर, मी संगमनेरला येवून तुझे अपहरण करील व तुझी विक्री करुन टाकील’ अशा भाषेत पीडितेला धमकावले. यावेळी पीडिता फसली आणि तिने नको ते केले. त्याचा परिणाम तिला ब्लॅकमेल करुन थेट तिला पळवून नेवून अत्याचार करण्यात झाले.


पीडितेचे हवे तसे छायाचित्र मिळताच आरोपी गुरुवारी दुचाकीवरुन (ता.29) थेट संगमनेरात आला व पीडित मुलगी महाविद्यालयात जात असताना रस्त्यात आडवून त्याने पुन्हा ‘त्या’ छायाचित्राचा आधार घेत ‘तिला धमकावले. ‘तु जर उद्या सकाळी बॅग घेवून संगमनेर बसस्थानकावर आली नाहीस तर, तुझे विवस्त्र फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल करील’ असा दम भरुन तो निघून गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासूनच त्याने पीडितेला फोन करुन, निघालीस की नाही अशी एकसारखी विचारणा करुन तिचा पीच्छा पुरवला. अखेर वैतागून 17 वर्ष 6 महिने वयाची पीडित मुलगी त्याच्या मनासारखेच करीत चक्क बॅग घेवून रिक्षाने संगमनेर बसस्थानकात पोहोचली.


त्या ठिकाणी आरोपी अमीर रेहान मलिक डेरे दाखलच होता. त्याने लागलीच पीडितेसह नाशिककडे जाणारी बस पकडली, तेथून रेल्वेने मुंबई गाठली. पीडित मुलगी पहिल्यांदाच मायानगरीत आल्याने तिला सगळ्या गोष्टी आणि त्यांची नावं तशी अपरिचितच होती. आरोपी मात्र संगमनेरपासून ते मुंबईपर्यंत आणि तेथून थेट उत्तर प्रदेशपर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून होता. त्याला त्यासाठी हवी तशी ‘रसद’ही मिळत होती. त्या बळावरच उत्तर प्रदेशातील एक सामान्य ड्रायव्हर थेट संगमनेरात येतो काय आणि अल्पवयीन मुलीला घेवून पसार होतोय काय सगळेच आश्‍चर्यजनक. मुंब्रा येथील पत्राचाळीत गेल्यानंतर आरोपीने पीडितेला एका इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर नेले. यावेळी त्याने चक्क आपल्या खिशातून खोलीची चावी काढून दार उघडले.


पीडितेने त्याबाबत विचारणा केली असता भाड्याने घेतल्याचे उत्तर त्याने दिले. शुक्रवारी (ता.1) रात्री जेवण करुन झोपल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून बळजोरीचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने नकार दिला. त्यानंतर त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली, मात्र तरीही पीडित मुलगी ऐकण्याच्या मानस्थितीत नसल्याचे पाहून त्याने तिला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. दुसर्‍या दिवशी (ता.2) दुपारी खोलीला बाहेरुन कुलुप लावून तो निघून गेला. दोन-तीन तासानंतर आला त्यावेळी त्याच्यासोबतच तीन लहान मुलीही होत्या. हा प्रकार पाहुन तर अपहृत पीडिता थरथरु लागली. यावेळी त्याने तीनही मुली आपल्याच असल्याचे मात्र पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे सांगत आपण लग्न करणार असल्याची थाप तिला दिली.

रात्री घरात आणलेल्या तीनही मुली झोपी गेल्यानंतर त्या नराधमाने पीडितेला पुन्हा मारहाण करीत लग्नासाठी धर्मांतरण करण्याचा दबाव सुरु केला. त्याला वारंवार नकार देणार्‍या पीडितेला तो यातना देवू लागला. एव्हढं करुनही तो थांबला तर, त्याने तिच्यावर पुन्हा अत्याचारही केला. दरम्यानच्या काळात सदरील मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याने संगमनेर शहर पोलीस सक्रिय झाले होते. त्यामुळे अपहरण झालेल्या मुलीची सुटका होण्याच्या आशा कायम होत्या. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तांत्रिक बाजू खांद्यावर घेत वेगवेगळ्या ठिकाणच्या यंत्रणांशी समन्वय स्थापित केला.

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी मिळालेल्या माहितीचा माग काढण्याचे व्यवस्थापन सांभाळले. उपनिरीक्षक निवांत जाधव, इम्रान शेख, हवालदार अशोक पारधी, पोलीस शिपाई शशीकांत दाभाडे यांनी प्रत्येक आदेशाची तत्काळ अमलबजावणी करीत रात्रीचा दिवस करुन मुंबई गाठली. क्षण क्षण आरोपीचा माग काढीत मुंबईतील अत्यंत संवेदनशील भागात छापा घातला. अर्थात शिळ डायघर पोलिसांनी केलेले सहकार्यही खूप महत्वाचे मानावे लागतील. या सर्वांच्या परिश्रमांचा परिपाक संगमनेरात पहिल्यांदाच ‘प्रकट’ होवू पाहणारी लव्ह जिहादची घटना घडण्यापूर्वीच थोपवली गेली.


याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी अमीर रेहान मलिक (वय 33, रा.कादीराबाद, डुमरीयागंज, जि.सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात अपहरण, लैंगिक अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्यातील (पोक्सो) तरतुदींसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसीटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी त्याला संगमनेरच्या न्यायालयासमोर उभे केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा दाट संशय असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. आरोपीकडून इतर ठिकाणच्या काही मुलींची व्यक्तिगत माहितीही मिळाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याचीही शक्यता आहे.


उत्तर प्रदेशातील अशिक्षित ड्रायव्हर शेकडों किलोमीटर अंतरावरील अल्पवयीन मुलीला सोशल माध्यमातून फसवतो. तिचा विश्‍वास संपादन करुन तिची नग्न छायाचित्रे प्राप्त करतो आणि नंतर त्याचाच वापर करुन थेट उत्तर प्रदेशातून व्हाया मुंबईहून संगमनेरात येवून त्या मुलीचे अपहरण करुन घेवूनही जातो हा सगळा प्रकार प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारा आहे. आरोपीने पीडितेला प्रत्यक्ष धमकी देताना दुचाकीचा वापर केला आणि नंतर दुसर्‍या दिवशी पीडितेसह बस आणि रेल्वेने प्रवास करुन मुंबई गाठली. याचा अर्थ आरोपीला मुंबईपासून संगमनेरपर्यंत रसद मिळत असल्याचे स्पष्ट आहे. पोलीस आणि स्थानिक पुढारी यांनी भविष्यातील धोका ओळखून या प्रकरणाचा सखोल तपास होवू देण्याची गरज आहे. अन्यथा ‘लव्ह जिहाद’ वेशीवर धडकलाच आहे.

Visits: 40 Today: 1 Total: 114921

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *