शिर्डी लोकसभा मतदार संघात रामदास आठवलेंची एन्ट्री? संभाव्य उमेदवारांच्या यादीत अग्रणी; दीड दशकांपूर्वीच्या निकालाला पुन्हा उजळणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय समितीने देशभरातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. मात्र महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये मित्रपक्षांसमवेत जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याने या राज्यांमधील उत्कंठा वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे निवडणूक रणनितीकार अमित शाह आजपासून दोन दिवस राज्याच्या दौर्यावर असून त्यांच्या उपस्थितीत राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. भाजपने 25 जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केल्याची सूत्रांची माहिती असून त्यानुसार शिर्डी लोकसभेची निवडणूक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) सर्वेसर्वा रामदास आठवले लढवणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास शिर्डीत 2009 साली रंगलेल्या लढतीचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिर्डीच्या लढतीकडे आता राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

सोळाव्या लोकसभेपासूनच अंतर्गत धुसफूस वाढलेल्या भाजप-शिवसेनेच्या 25 वर्षांच्या युतीचा अखेर 2019 मध्ये काडीमोड झाला. राज्यात राजकीय भूकंप व्हावा अशा पद्धतीने स्वप्नातही कोणी विचार केला नसेल असा धक्का देत संयुक्त शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेत सत्तेची मोटही बांधली आणि अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदही मिळवले. मात्र पक्षप्रमुखांचा हाच निर्णय गेली सहा दशके ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी’ असे ब्रिद आणि कडवे हिंदुत्त्व घेवून अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या शिवसेनेची शकले उडवणारा ठरला. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देवून पक्षाच्या जन्मापासून ज्यांना विरोध केला, त्यांच्यासोबतची राजकीय हातमिळवणी सत्तेत असूनही अनेक कडव्या शिवसैनिकांना रुचली नाही. त्याचा परिणाम तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या 55 आमदारांमधील 40 आमदारांनी वेगळी चूल मांडण्यात झाला.

कालांतराने महाविकास आघाडीचे गणित यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या ज्येष्ठनेते शरद पवार यांनाही पक्षफूटीचा सामना करावा लागला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील मोठा गट फोडून महायुतीचा हात धरला आणि राज्यातील राजकीय समिकरणांची अक्षरशः खिचडी झाली. अर्थात लोकसभा निवडणुकीत शिंदे आणि पवार यांची संपूर्ण भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावरच अवलंबून असल्याने सद्यस्थितीत महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा याचाच निर्णय होवू शकलेला नाही. त्यातच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील 48 पैकी 33 जागा लढवण्याचा आग्रह लावून धरल्याने राज्याच्या पातळीवर जागावाटपाचा तिढा सुटणे अशक्य आहे, अशातच गृहमंत्री अमित शाह आज आणि उद्या दोन दिवस राज्याच्या दौर्यावर असून मंगळवारी रात्री उशिराने ते मुंबईत महायुतीतल्या मित्रपक्षांशी जागावाटपावर चर्चा करुन तोडगा काढतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यातही झाला असून शिर्डीची जागा केंद्रस्थानी आली आहे. या मतदार संघात गेल्या दोनवेळा सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर बाजी मारली होती. राज्यातील सत्ता समिकरणं बदलल्यानंतर त्यांनीही शिवसेनेच्या अन्य काही खासदारांसह शिंदे गटात प्रवेश केला. मात्र सलग दहा वर्ष संधी मिळूनही मतदारांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याने मतदार संघातील त्यांच्या विषयीची नाराजी पक्षाला परवडणारी नसल्याने त्यांना उमेदवारी दिल्यास काय होईल? याबाबत भाजपने चाचपणी केल्याचे समजते. मात्र त्याचा अहवाल लोखंडेंसाठी अनुकूल नसल्याचे समोर आल्याने त्यांना उमेदवारी नाकारली जाण्याचीच अधिक शक्यता व्यक्त होत आहे.

शिर्डीच्या जागेसाठी गेल्या 15 वर्षांपासून माजीमंत्री बबन घोलपही उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख म्हणून काम करताना एकेकाळच्या आपल्या जुन्या सहकार्यांना साद घालीत त्यांची मोट बांधण्याचाही प्रयत्न केला. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2014 साली
शिवसेनेचा त्याग करुन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी थेट मातोश्रीचे दरवाजे उघडल्याने घोलप नाराज झाले. पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी त्यांच्याजागी सुनील शिंदे यांना शिर्डीचे संपर्कप्रमुख नेमल्याने ते आणखी दुखावले आणि त्यांनी थेट पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा पाठवला, मात्र पक्षाने तो नामंजूर केला. त्यानंतरही पक्षाकडून घोलपांच्या नाराजीला फारसे महत्त्व न मिळाल्याने अखेर त्यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

त्यामुळे शिर्डीत महायुतीचे उमेदवार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात असतांनाच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) सर्वेसर्वा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह माजीमंत्री बबन घोलपही राजकीय व्हेंटीलेटरवर गेले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी मतदार संघातील कार्यकर्त्यांशीही संवाद वाढवला असून आज (ता.5) दुपारी ते अकोले तालुक्यातील शिक्षणसंस्थेच्या इमारत उद्घाटन सोहळ्या निमित्त जिल्ह्यात येत आहेत. दुपारी चारच्या सुमारास शिर्डीत समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसमवेत बैठकीनंतर ते अकोल्याकडे प्रस्थान करतील.

उद्घाटन सोहळ्यानंतर अकोले येथील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ते संगमनेर बसस्थानक परिसरात येणार असून त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत कार्यकर्त्यांशी संवादासाठीची वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिराने मोटारीने ते मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. त्यांचा आजचा दौरा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आखण्यात आल्याचे बोलले जात आहे. उच्चस्तरीय सूत्रांकडून प्राप्त होत असलेल्या माहितीनुसारही भाजपच्या संभाव्य उमेदवार यादीत आठवले यांचा समावेश असल्याचे व त्यांच्यासाठी शिर्डीची जागा सोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून रामदास बंडू आठवले यांच्या नावाची घोषणा झाल्यास आश्चर्य वाटू नये.

रामदास आठवले यांनी यापूर्वी 2009 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीकडून शिर्डीची उमेदवारी केली होती. त्यावेळी महायुतीकडे दिग्गज उमेदवाराची
वाणवा असल्याने ऐनवेळी श्री साईबाबा संस्थानचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांना मैदानात उतरवले गेले. त्यावेळच्या निवडणुकीत वाकचौरे यांना 3 लाख 59 हजार 921 मतं मिळाली, तर रामदास आठवले यांना 2 लाख 27 हजार 170 मतं मिळाली आणि त्यांचा तब्बल 1 लाख 32 हजार 751 मतांनी दारुण पराभव झाला होता. वाकचौरे आणि आठवले यांच्यातील मतांच्या फरकाची टक्केवारीही तब्बल 20 टक्के होती हे विशेष. मात्र सध्या राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीही फूटल्याने आणि दोन्ही पक्षांचे फूटीरगट भाजप सोबत असल्याने रामदास आठवले यांना आपला विजय सोपा वाटत आहे.

त्यामुळेच त्यांनी शिर्डीच्या जागेसाठी निरंतर आग्रह धरला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी दुसर्यांदा शिर्डीला भेट दिली असून कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला आहे. त्यामुळे शिर्डीचा गुंता आणखी वाढला असून संभाव्य उमेदवारांच्या नावात भर पडत असल्याने शिर्डीची उमेदवारी कोणाच्या पदरात पडणार याची उत्कंठा वाढत आहे. अर्थात भाजपने 18 वी लोकसभाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहर्यावर लढवण्याचा निर्णय घेतला असून ‘अबकी बार चारसौ पार’चा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे निवडणूक रणनितीकार अमित शाह आजपासून दोन दिवस राज्याच्या दौर्यावर आहेत. आज सायंकाळी मुंबईतील बैठकीत जागा वाटपावर चर्चा होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या हक्काच्या शिर्डी मतदार संघासाठी कोणता उमेदवार निश्चित होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

भाजपचे संभाव्य उमेदवार – उत्तर मुंबई : विनोद तावडे किंवा पियूष गोयल, ईशान्य मुंबई : मनोज कोटक, उत्तर-मध्य मुंबई : पूनम महाजन (शक्यता), बीड : पंकजा मुंडे, सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले, चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार किंवा अशोक जीवतोडे, छत्रपती संभाजीनगर :
भागवत कराड किंवा अतुल सावे, पुणे : मुरलीधर मोहोळ, धुळे : प्रताप दिघावकर, नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर, जालना : रावसाहेब दानवे, अकोला : संजय धोत्रे, नागपूर : नितीन गडकरी, नंदूरबार : विजय किंवा हिना गावित, पालघर : राजेंद्र गावित, रावेर : रक्षा खडसे किंवा केतकी पाटील, शिर्डी : रामदास आठवले किंवा बबन घोलप, सोलापूर : अमर साबळे, भंडारा-गोंदीया : सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूर : अशोक नेते, भिवंडी कपिल पाटील, सांगली संजयकाका पाटील, दिंडोरी : डॉ.भारती पवार, धाराशिव : बसवराज पाटील किंवा बसवराज मंगरुळे, अमरावती : नवनीत राणा, अहमदनगर : डॉ.सुजय विखे पाटील.

शिवसेना (शिंदे) संभाव्य उमेदवार – दक्षिण-मध्य मुंबई : राहुल शेवाळे, मावळ : श्रीरंग बारणे, वाशिम-युवतमाळ : संजय राठोड, नाशिक : हेमंत गोडसे, बुलढाणा : प्रताप जाधव, हातकणंगले : धैर्यशील माने, हिंगोली : हेमंत पाटील, वर्धा : रामदास तडस, रामटेक : कृपाल तुमाने. याशिवाय तिढा असलेल्या जागांमध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग जागेसाठी शिवसेनेच्या किरण सामंत यांच्यासह भाजपचे नारायण राणे, माढ्यात भाजपच्या रणजीत निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर, रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि भाजपचे धैर्यशील पाटील.

नैसर्गिेक तत्त्वाने महायुतीत शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या (शिंदेगट) वाट्याला आहे. मात्र विद्यमान खासदाराबाबत मतदारांमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर येथील उमेदवार बदलला जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या महिन्यात माजीमंत्री बबन घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवूनही अद्याप कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतलेला नाही, त्यामुळेही शिर्डीतील उत्कंठा वाढली असून आज-उद्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

