जायकवाडीच्या पाण्यासाठी ‘मै हूँ ना’; जलसंधारण मंत्र्यांचा लाभधारकांना विश्वास सोनई येथील आमराई विश्रामगृहात शेतकरी व पाटबंधारे अधिकार्‍यांची बैठक

नायक वृत्तसेवा, नेवासा
जायकवाडी बॅक वॉटर पट्ट्यातील शेतीच्या पाण्यासाठी अधिकार्‍यांकडून मोठी अडवणूक होत असली, तरी या भागातील शेतकर्‍यांच्या हितासाठी यापुढे कुठलीही अडचण होणार नाही. कुठलीही समस्या असू द्या, ‘मै हूँ ना,’ असा ठाम विश्वास जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला आहे.

नेवासा तालुक्यातील घोगरगाव ते रामडोह दरम्यानच्या गावांमधील शेतकर्‍यांच्या शेतीसाठीच्या पाईपलाईन गोदावरी नदीपात्रामधून आहेत. या परिसरातील शेती पूर्णत: या पाईपलाईनच्या उपसा सिंचनावर अवलंबून आहेत. जायकवाडी पाटबंधारे विभागात या पाईपलाईन आहेत. पाणी परवाना नूतनीकरण करणे, पाणीपट्टी भरणे, वारसांच्या नावे पाणी परवाना हस्तांतरित करणे, नवीन पाणी परवाना प्रस्ताव करणे, वीज जोडणी घेणे आदी प्रश्नांवर सोनई येथे आमराई विश्रामगृहात शेतकरी व अधिकार्‍यांची बैठक झाली.

शेतकरी दादासाहेब चिमणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी काकासाहेब शिंदे, श्रीरंग हारदे, डॉ. करण घुले, अण्णासाहेब पटारे, जगन्नाथ कोरडे यांची भाषणे झाली. अधीक्षक अभियंता अभिजीत मेहेत्रे यांनी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना यापुढे कुठलीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता पी. बी. जाधव, जायकवाडी सिंचन प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी अविनाश पांडुळे उपस्थित होते.

गडाख म्हणाले, की जायकवाडी बॅक वॉटर पट्ट्यातील पाईपलाईनधारकांनी कुठल्याही अधिकार्‍यांना पैसे देऊ नयेत. कोणी पैसे घेऊन शेतकर्‍यांची अडवणूक करत असेल तर शेतकर्‍यांनी माझ्याशी संपर्क करावा. सर्व शेतकर्‍यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी यंत्रणेमार्फत स्वतंत्र सेलची निर्मिती करणार आहे. यापुढे कोणालाही शेतीच्या पाण्यासाठी मनःस्ताप सहन करावा लागणार नाही, असे गडाख म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. या बैठकीस मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, कडुबाळ कर्डिले, दादासाहेब शेळके, जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब नवथर यांच्यासह घोगरगाव, बेलपिंपळगाव, गोधेगाव, प्रवरासंगम, मंगळापूर, गळनिंब, गोगलगाव, सलाबतपूर, शिरसगाव, वाकडी, रामडोह आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते.

Visits: 10 Today: 1 Total: 79723

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *