पतसंस्थेने जमिनीवर बोजा चढवल्याने व्यवस्थापकावर हल्ला संगमनेरातील धक्कादायक घटना; एकतर चोर अन् वर शिरजोरचा प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जमिन तारण ठेवून पतसंस्थेकडून घेतलेल्या 21 लाख 50 हजार रुपयांच्या कर्जापोटी कोणताही परतावा न केल्याने तारण मालमत्तेवर बोजा चढला. त्याचा राग मनात ठेवून चिकणीच्या बाप-बेट्याने दंडेलशाही करीत थेट संगमनेरातील त्या पतसंस्थेत मनसोक्त धिंगाणा घातला. संस्थेच्या व्यवस्थापकाकडून वारंवार वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न होवूनही आपल्याच धुंदीत असलेल्या त्या दोघांनी बलराम सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक पद्माकर मतकर यांना बेदम मारहाण केली. यावेळी पोराने पेपरवेट फेकून तर बापाने गचांडी धरुन टेबलावरील काचेवर त्यांचे डोके आपटून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी मदतीसाठी धावलेल्या महिला कर्मचार्यांवरही दोघे बापलेक अर्वाच्च शिवीगाळ करीत धावून गेले. या प्रकरणी व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन संजय वर्पे व त्याचा मुलगा गौरव याच्यावर मारहाण करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना बुधवारी (ता.6) दुपारी साडेतीनच्या सुमारास अकोले बायपास रस्त्यावरील बलराम सहकारी पतसंस्थेत घडली. संस्थेतील कर्मचारी नियमित कामकाज करीत असताना साडेतीनच्या दरम्यान संजय लक्ष्मण वर्पे व त्याचा मुलगा गौरव हे दोघेही कार्यालयात आले. त्यांनी थेट व्यवस्थापक पद्माकर वसंत मतकर यांच्या दालनात जात त्यांना आरेरावी करु लागले. संजय वर्पे याने; ‘तु आमच्या शेतजमिनीवर जप्ती बोजा का चढवलास?, माझ्या मुलाच्या नावावर असलेल्या जमिनीवर बोजा का दाखवला?’ असे दरडावितच विचारणा करु लागला.
त्यावर व्यवस्थापक मतकर यांनी जमिनीवर बोजा कसा चढला हे फाईल पाहील्यानंतर लक्षात येईल असे समजूतीने सांगत त्यांना त्यांच्या कर्जप्रकरणाची फाईलही दाखवली. चार वर्षांपूर्वी पतसंस्थेकडून जमिन तारण ठेवून 21 लाख 50 हजारांचे कर्ज घेतले व त्यानंतर त्या पोटी एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे नियमानुसार ही प्रक्रिया झाल्याचेही त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र कर्ज घेतले म्हणजे जणू संस्थेने त्यांना बक्षिसच दिल्याच्या अविर्भावात असलेल्या त्या बापलेकाने व्यवस्थापकावर हल्ला केला.
कर्जदार संजय वर्पे याने व्यवस्थापक मतकर यांची कॉलर पकडून ‘**** माजला का?, तुझी ** *** टाकीन’ अशा घाणेरड्या शिव्या देत, ‘तु बाहेर भेट, तुझा कार्यक्रमच करतो..’ अशी धमकीही भरली. त्याचवेळी त्याचा मुलगा गौरव याने टेबलवरील काचेचा पेपरवेट उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला, मात्र ते वेळीच खाली वाकल्याने त्याचा प्रहार पाठीला सहन करावा लागला. मतकरांची सहा महिन्यांपूर्वीच अतिशय अवघड शस्त्रक्रिया झाली होती. त्याचीही माहिती मारहाण करणार्या दोघांना होती. म्हणूनच पाठीत पेपरवेट लागल्यानंतर संजय वर्पे याने ‘तेव्हा तुझी शस्त्रक्रिया झाल्याने तु वाचला, पण माझ्या हातून वाचणार नाहीस..’ असे म्हणत त्याने गचांडे पकडून मतकरांचे डोके टेबलवर आपटले. त्यामुळे टेबलवरील काच फूटून मतकरांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यातून रक्तस्राव सुरु झाला.
या गदारोळात वर्पेने त्यांचा खिसाही फाडून टाकला. ‘तुला कोठेही तोंड दाखवायच्या लायकीचा सोडणार नाही’ असे तो म्हणत असतानाच पतसंस्थेतील महिला कर्मचारी व्यवस्थापकाच्या मदतीला धावल्या. मात्र बापलेकाने त्यांनाही घाणेरड्या शैलीत शिवीगाळ व दमदाटी करीत मागे लोटले. दोघांनी बराचवेळ पतसंस्थेच्या कार्यालयात धुडगूस घालीत टेबलवरील काचा फोडून इतर सामान व कागदपत्रांची नासधूस केली. यावेळी तेथून जातानाही संजय वर्पे याने ‘तु फक्त बाहेर भेट, तुझा कार्यक्रमच करतो‘ अशी धमकी देत दोघेही निघून गेले. त्यानंतर अन्य कर्मचार्यांनी त्यांना रुग्णालयात नेवून उपचार केले.
याप्रकरणी सायंकााळी उशिराने बलराम सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक पद्माकर मतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुक्यातील चिकणी येथील संजय लक्ष्मण वर्पे व त्याचा मुलगा गौरव या दोघांवर 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने पतसंस्था क्षेत्रात खळबळ उडाली असून एकतर चोर अन् वर शिरजोर झालेल्या या दोघा बापलेकांना कायद्याचा धाक दाखवण्याची मागणी होत आहे.