श्रीरामपूर शहरातील प्रवरा कालव्यावरील पुलाकडे दुर्लक्ष रस्त्याच्या कामासाठी दोन निमंत्रित असतानाही पुलाकडे दुर्लक्ष

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण पालिका, तर बेलापूर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. दोन्ही ठेकेदारांनी निविदेत उल्लेख केल्याप्रमाणे काम पूर्ण केले. या दोन्ही रस्त्यांदरम्यान प्रवरा डावा कालवा असून त्यावरील पुलाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिकांवर नाहक प्रतीक्षा करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या रस्त्याच्या कामासंदर्भात विरोधकांकडून वारंवार मागणी केली जात होती. वेळप्रसंगी आंदोलनेही झाली. माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या काळात पालिकेच्या रस्ता अनुदानातून 45 लाख खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण झाले. पालिकेने हे काम महात्मा गांधी पुतळ्यापासून बेलापूर पुलापर्यंत केले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ‘प्रवरा डावा कालावा ते वेस’ या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले.

यासाठी 1 कोटी 25 लाखांचा निधी खर्च करण्यात आला. महात्मा गांधी पुतळा ते वेसपर्यंत रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 70 लाखांचा खर्च झाला. पालिकेचे डांबरीकरण पुलाच्या एका बाजूला संपले, तर दुसर्या बाजूने आमदार निधीतून काम सुरू झाले. रस्त्याच्या कामासाठी दोन निमंत्रित असताना दोघांकडून पुलाकडे दुर्लक्ष झाले. यामुळे पुलाच्या डांबरीकरणासाठी नागरिकांवर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

पुलाच्या डांबरीकरणाचे काम राहिले आहे. पालिकेच्या एखाद्या कामात हे काम केले जाईल. तसेच पुढे सिद्धीविनायक हनुमान मंदिराजवळही रस्त्याच्या एका कोपर्याचे काम राहिले असून तेही करण्यात येईल.
– गणेश शिंदे (मुख्याधिकारी, श्रीरामपूर पालिका)
