आमदार बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम बैलगाडा शर्यत, रक्तदान, वक्तृत्व स्पर्धांचे राज्यभरात आयोजन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य व काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्हा व राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

१९८५ पासून संगमनेर विधानसभेचे विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधीत्व करताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले. याचबरोबर संगमनेर तालुक्यात प्रत्येक वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवताना तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल बनवले. समृद्ध सहकाराबरोबर शैक्षणिक व मेडिकल हब म्हणून संगमनेर आज राज्याच्या नकाशावर दिसते आहे.

शहरासाठी थेट पाईपलाईन योजना, विविध वैभवशाली इमारती, गार्डनयुक्त शहर, गावोगावी रस्ते, विद्यालय, सहकारी संस्था यामधून संगमनेर तालुक्याची ओळख ही प्रगतशील तालुका बनली आहे. तालुक्याच्या विकासाबरोबर आमदार थोरातांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करताना विविध पदे भूषवली आहेत. राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोजगार हमी, पाटबंधारे, जलसंधारण अशी महत्त्वाची पदे भूषवली असून या खात्यांना लोकाभिमुख बनवले आहे. याचबरोबर अत्यंत अडचणीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सांभाळताना त्यांनी ४४ आमदारांना विजयी करत महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

सर्व पक्षांशी सलोख्याचे संबंध, पक्षनिष्ठा, सर्वधर्म समभाव व पुरोगामी विचार जपणार्‍या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल संपूर्ण राज्यात मोठा आदर आहे. दरवर्षी अत्यंत साधेपणाने आमदार थोरात हे वाढदिवस करत असतात. मात्र यावर्षी लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात मित्रमंडळाच्यावतीने मोठमोठ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी हे महानाट्य ४ ते ७ फेब्रुवारी याकाळात जाणता राजा मैदानावर होणार असून ते सर्वांसाठी मोफत आहे. तर राजवर्धन यूथ फाऊंडेशनच्यावतीने नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पठारभागामध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन होत आहे. तर निमगाव जाळी, तळेगाव, येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेमध्ये रक्तदान याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्य पातळीवरही बीड, परभणी, अमरावती, नाशिक, धुळे, जळगाव, पालघर आणि लातूरमध्ये जिल्ह्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन होत असून संपूर्ण राज्यभरात हा वाढदिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा होणार आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 114865

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *