एस.टी.च्या संपाला संगमनेरात लागले गालबोट! दोन बसेसवर अज्ञातांची दगडफेक; एका प्रवाशी महिलेला गंभीर दुखापत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी परिवहन महामंडळ कर्मचार्यांच्या शांततामय मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला संगमनेरात आज गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आज शनिवारी नाशिक जिल्ह्यातील दोन आगारांंच्या दोन स्वतंत्र बसेसवर संगमनेर तालुक्यात दगडफेक करण्यात आली. यात दोन्ही बसच्या काचा फुुटल्या व दुसर्या बसमधील एका महिला प्रवाशाला मोठी दुखापत झाली. या दोन्ही घटनांनंतर हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी वृत्त लिहेपर्यंत शहर व तालुका पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या परिवहन महामंडळातील (एस.टी) 250 आगाराचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या कालावधीत राज्य सरकारकडून संपकर्यांशी चर्चेच्या फेऱ्याही रद्द झाल्या, त्यातून राज्य सरकारी कर्मचार्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता आणि मूळवेतनात अडीच ते पाच हजारांपर्यंतची वाढ देण्याची तयारी महामंडळाने दाखविली. मात्र राज्यातील बहुतेक आगारातील कर्मचारी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम राहील्याने सरकारसोबत सुरु असलेली चर्चेची कवाडे
बंद होवून सरकारकडून कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली, मात्र त्यानंतरही बहुतांशी कर्मचारी अजूनही संपावर ठाम असल्याने लालपरीची चाके अद्यापही खोळंबलेलीच आहेत.

ऐन दिवाळीच्या दिवशी सुरु झालेल्या या आंदोलनाचा संगमनेरातील उपोषणाचा आजचा 60 वा दिवस आहे. या कालावधीत राज्यातील सर्वच आगारांच्या परिसरात त्या-त्या ठिकाणचे कर्मचारी उपोषणाला बसले आहेत, तर मुंबईच्या आझाद मैदानावरील आंदोलनातही अनेकजण सहभागी झाले होते. या दरम्यान कर्मचार्यांच्या मागण्यांचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयातही पोहोचला, मात्र त्यातूनही अद्यापपर्यंत मार्ग निघालेला नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेले एस.टी.कर्मचार्यांचे आंदोलन आजही कायम आहे. या दरम्यान राज्य सरकारकडून कर्मचार्यांना कामावर परतण्यासाठी वेळोवेळी इशारे दिले गेल्याने राज्यातील 250 आगारातील सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने अशा आगारातील बसेसच्या काही फेेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.

संगमनेर आगातील सर्व कर्मचारी मात्र अद्यापही आपल्या मागण्यांवर ठाम असून सर्वच्या सर्व 350 कर्मचारी आजही आंदोलनात सहभागी आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत या संपकर्यांकडून कोणत्याही स्वरुपाची उग्रता दिसून आलेली नसून संगमनेरात शांततामय मार्गाने आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाला आज घडलेल्या दोन घटनांनी एकप्रकारे गालबोट लावण्याचा प्रयत्न. यातील पहिली घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आगाराच्या ‘लोणी-नाशिक’ बससोबत घडला. लोणीहून संगमनेरात आलेली ‘लोणी-नाशिक’ (एम.एच.17/सी.9588) ही बस सकाळी पावणे आठच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात आली. त्यानंतर येथून पुढे ती नाशिककडे निघाल्यानंतर संगमनेर महाविद्यालयाजवळील ऐश्वर्या पेट्रोल पंपाजवळ पोहोचली असता या बसच्या दर्शनीभागावर कोणीतरी अज्ञातांनी दगड फेकून मारले. त्यातील एक दगड बसचालकाच्या समोरील काचेवर आदळल्याने त्यात बसची दर्शनी काच फुुटली,

त्यामुळे बसचालकाने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करुन प्रवाशांना अन्य वाहनातून पुढचा प्रवास करण्यास सांगितले. याबाबत बसचालकाने सिन्नर आगारातील वरीष्ठांना माहिती दिली आहे. मात्र या घटनेबाबत वृत्तलिहेपर्यंत संगमनेर पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. सिन्नरहून महामंडळाचे अधिकारी संगमनेरात आल्यानंतर याबाबत तक्रार दाखल करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

तर आजच तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील चंदनापुरी शिवारात नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या एका बसवरही असाच प्रसंग गुदरला. दुपारी सव्वा एकच्या सुमारास आनंदवाडी येथे पिंपळगाव बसवंत आगाराची नाशिक-पुुुणे (क्र.एम.एच.14/बी.टी.0565) ही बस घेवून चालक व्ही.ए.पाटील पुण्याकडे जात होते. त्यांची बस आनंदवाडी शिवारात येताच अज्ञात इसमाने चालकाच्या दिशेने दगड भिरकावला, मात्र ऐनवेळी चालकाने स्त:चा बचाव केल्याने तो पाठीमागील बाजूस बसलेल्या ज्योती महेश फरतळे (रा.नाशिक) यांंच्या डोक्याला लागला. त्यांना तत्काळ नजीकच्या गुंजाळ हॉस्पिटलमध्ये नेवून उपचार करण्यात आले.

या घटनेशी संगमनेर बस आगारातील आंदोलकांचा कोणताही संबंध नसल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले असून सदर दोन्ही प्रकरणातील आरोपी खासगी वाहनांशी संबंधित असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. गेल्या साठ दिवसांपासून राज्यासह संगमनेरात सुरु असलेल्या महामंडळाच्या आंदोलनादरम्यान संगमनेर शहर हद्दित एकाच दिवशी दोन घटना घडल्याने व त्यात पहिल्यांदाच प्रवाशीही जखमी झाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले असून अज्ञात असलेल्या हल्लेखोराला हुडकून काढण्याचे मोठे आव्हान शहर व तालुका पोलिसांसमोर आहे.

आज एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटना तशा किरकोळ असल्या तरीही आजच्या परिस्थितीत त्याचे गांभिर्य अधिक आहे. संगमनेर आगारातील कर्मचार्यांनी या घटनेबाबत कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्याने मग हल्ला करणारे कोण? याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेमागे खासगी प्रवासी वाहतुकदारांचा हात असण्याची शक्यता वर्तविली गेली असली तरीही यामागील हेतू वेगळा असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करण्याची आणि गुन्हेगार गजाआड करण्याची गरज आहे.

