ठाकरेगटाचे माजीमंत्री बबन घोलप भाजपाच्या वाटेवर? शिर्डीची जागाही भाजप बळकावणार; पुढील लोकसभेचीही पायाभरणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले, उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठनेते, माजीमंत्री बबन घोलप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनंतर देशात लोकसभा निवडणुकीची वातावरण निर्मितीही सुरु झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशात विद्यमान खासदारांनी निष्ठांतर करुन शिंदेगटात प्रवेश केल्याने शिर्डीच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता वंचित बहुजन पक्षानेही दावा केला आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये पेच निर्माण झालेला असतानाच भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशापासून दुखावलेले ठाकरेगटाचे ज्येष्ठनेते बबन घोलप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. देवळालीतून मुलगा विधानसभेत आणि शिर्डीतून आपण लोकसभेत यावर सध्या वाटाघाटी सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची धडधडही वाढली आहे. पुढच्या पंचवार्षिक निवडणूकीत शिर्डी मतदार संघ खुला होणार असल्याने खासदार डॉ.सुजय विखे यांच्यासाठी तो बळकावण्याची योजना भाजपने आखल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांचा वरचष्मा असलेला पूर्वीचा कोपरगाव आणि 2009 नंतरचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. सुरुवातीच्या दोन निवडणूका डॉ.अण्णासाहेब शिंदे यांनी लढविल्यानंतर 1971 ते 1991 पर्यंत सलग पाच निवडणुकांमध्ये दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील निवडून आले. 1991 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून शंकरराव काळे विजयी झाले. 1996 साली कोपरगाव लोकसभा मतदार संघात पहिल्यांदा विरोधाचा झेंडा फडकला आणि भाजपचे भिमराव बडदे 20 हजार 251 मतांनी पहिल्यांदाच विजयी झाले. मात्र 1998 सालच्या मुदतपूर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने कोपरगावची जागा पुन्हा खेचून घेतली. या निवडणुकीत राहुरीचे प्रसाद तनपूरे 79 हजार 240 मतांनी विजयी झाले.


याच कालावधीत ज्येष्ठनेते विखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने 1999 साली हा मतदार संघ शिवसेनकडे आला. तेव्हापासून गेली 25 वर्ष तो शिवसेनेकडेच असल्याने गेल्या दशकभरात जागावाटपावरुन खडाजंगी होवूनही शिवसेनेने तो सोडला नव्हता. मात्र राज्यातील सत्तापालटाच्या नाट्यात शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदेगटात प्रवेश केला. त्यामुळे पूर्वीचा आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने सुरुवातीपासूनच आघाडीत दबाव निर्माण केला. राष्ट्रवादीनेही शिर्डीचा आग्रह धरण्यास सुरुवात केल्याने विरोधकांमध्ये शिर्डीवरुन पेच उभा राहीला. दुसरीकडे शिवसेना फूटीनंतरही पक्षात राहीलेले ज्येष्ठनेते बबन घोलप यांच्यावर पुन्हा विश्‍वास दाखवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीच्या संपर्कप्रमुख पदावर त्यांची निवड केली. त्याचवेळी त्यांनी 2009 साली खासदार होताहोता राहील्याची सल बोलून दाखवताना ठाकरेंकडून शिर्डीच्या उमेदवारीचा शब्दही पदरात पाडून घेतला.


मात्र खासदार लाखंडे यांच्या पलायनाने ठाकरेंच्या मनात शिर्डीच्या जागेने भय निर्माण केल्याने दशकापूर्वीच ‘गद्दार’ म्हणून ज्यांना भररस्त्यात मारहाण, धक्काबुक्की आणि शाईफेक केली गेली त्याच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना थेट मातोश्रीवर पक्षप्रवेश द्यावा लागला. वाकचौरेंच्या रुपाने आपल्याला सक्षम उमेदवार मिळाल्याचा आनंद दाटत असतांनाच पक्षाचा हा निर्णय जिव्हारी लागलेल्या घोलप यांनी नेतेपदासह संपर्कप्रमुखपदही सोडले. त्यानंतर जणू ते शिंदे गटात जातील अशा पद्धतीनेच त्यांना वागणूक देण्यात आली, त्यामुळे अखेर त्यांनी फायद्याचे राजकारण करण्यास सुरुवात केली असून शिंदेगटात जाण्याच्या चर्चांना हुल देत थेट भाजपाशीच चर्चा सुरु केल्याची खात्रीशीर माहिती आहे. विरोधी आघाडीतील बहुतेक पक्ष दावा करीत असलेला शिर्डी मतदार संघ नैसर्गिक तत्त्वाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे.


त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिंदे शिवसेनेच्या वाट्याला जाणे अपेक्षीत असताना माजीमंत्री बबन घोलप मात्र भाजपशी वाटाघाटी करीत असल्याच्या चर्चा समोर येत असल्याने हा मतदारसंघ शिंदेकडून बळकावला जाण्याची शक्यता आहे. जणकारांच्या म्हणण्यानुसार पुढील पंचवार्षिकला शिर्डी लोकसभा खुला मतदारसंघ होणार आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत तिकिट मिळणार नसल्याच्या अटीवरच घोलप यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे समजते. भाजपचे दिग्गज नेते व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र खासदार डॉ.सुजय यांच्यासाठी त्यांच्या आजोबांनी सातवेळा गाजवेळा हा मतदार संघ खुला करण्याची भाजपची योजना असल्याचेही यातून दिसून येत आहे.


त्यामुळे बबन घोलप यांनी वाहत्या वार्‍याची दिशा पकडून भाजपशी बोलणी सुरु केली असून देवळाली प्रवरा (जि.नाशिक) या आपल्या पारंपरिक मतदार संघातून मुलगा योगेश याच्यासाठी विधानसभेची उमेदवारी आणि 2024 सालची शिर्डी लोकसभेची उमेदवारी स्वतःसाठी असा त्यांच्या मागण्यांचा रोख असल्याचे समजते. यासर्व घडामोडी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची धडधड वाढवणार्‍या असून त्यांची उमेदवारी कापली जाण्याची चर्चा सुरुवातीपासूनच शिर्डी लोकसभा मतदार संघात सुरु आहे. आता घोलप यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाल्यासारखेच बोलले जात आहे.


गेल्या सलग पाच लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येत असलेल्या शिर्डी मतदार संघात यावेळची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदाराने शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेगटाचा दावा कमजोर झाला आहे. त्याचा परिणाम खासदार लोखंडे यांच्या पक्षांतरानंतर लागलीच काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला, त्यानंतर राष्ट्रवादीसह कालच आघाडीत सहभागी झालेल्या वंचितनेही शिर्डीच्या जागेचा आग्रह धरला आहे. त्यातच विद्यमान ती आपली असे समजून वावरणार्‍या शिंदेगटालाही घोलप-भाजप बोलणीने धक्का बसला आहे. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये देशाचा मूड काहीही असो, चर्चा मात्र शिर्डीचीच होणार असल्याचे दिसू लागले आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 20865

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *