संगमनेरचे देशपांडे ‘काका-पुतणे’ पुन्हा जगभरातील मोबाईलवर! श्रीराम नामाची जादू; आठ दिवसांत जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले स्वर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून संगमनेरी ‘काका-पुतण्या’ने सुयोग्य सुरावटींनी सजवून सादर केलेले ‘श्रीराम गीत’ सातासमुद्रापार पोहोचले आहे. संगमनेरचे रहिवाशी आणि वात्रटीकाकार मुरारी देशपांडे यांनी साकारलेले ‘कश्मीर बोले शीश उठाकर, बोले कन्याकुमारी, सदियों से थी मनोकामना, आज पुरी हुयी हमारी..’ हे गीत गेल्या आठ दिवसांपासून देशविदेशात अक्षरशः धुमाकूळ घालीत आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेने अवघे जग राममय झाले असताना काका-पुतण्याच्या या सुमधूर गीताने दुबईपासून अमेरिकेपर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या रामभक्तांना अक्षरशः डोलायला लावले आहे.

कवी मुरारी देशपांडे यांनी श्रीराम गीताचे लेखन केले तर त्यांचा पुतण्या, भास्कर संगीत विद्यालयाचे संचालक सर्वेश देशपांडे यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला समाजमाध्यमांमध्ये अवतरलेल्या या गीताने गेल्या आठवडाभरात देशाचा कानाकोपरा ओलांडून अवघ्या जगात धुमाकूळ घातला. हिंदीत लिहिलेल्या या गीतातून श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनापासून ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंतच्या धगधगत्या प्रसंगाचे वर्णन केले गेले आहेत. २१ जानेवारी रोजी व्हायरल झालेल्या या गीताने अयोध्येसह संपूर्ण देशात झालेल्या श्रीराम उत्सवातही स्थान मिळवले आणि तरुणाईचा जोश वाढवला. भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका अशा कितीतरी देशातील लाखो रामभक्तांच्या मोबाईलपर्यंत पोहोचलेल्या या गीताने संगमनेरचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्राच्या पल्याड नेण्याची किमयाही साधली.

देशपांडे काका-पुतण्याच्या जोडीने सादर केलेल्या या गीतातून श्रीराम जन्मभूमीचा गेल्या पाचशे वर्षांचा इतिहासच डोळ्यासमोर उभा राहतो. अयोध्येतील या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने मुरारी देशपांडे यांनी पहिल्यांदाच गीतकार म्हणून हिंदी भाषेतील गीत लिहिले आणि ते रामभक्तांनी डोयावर घेतले. एका रात्रीत जगात धुमाकूळ घालणार्‍या श्रीराम गीताबाबत बोलताना गीतकार मुरारी देशपांडे भावूक झाले. बुद्धी देणारा आणि हवं तसं करवून घेणारा रामराया आहे, मी त्याचे कारण बनलो हे आपले भाग्य अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या गीताचे संपूर्ण यश प्रभू श्रीरामांच्या चरणी समर्पित असल्याचे कृतज्ञ भावही देशपांडे काका-पुतण्याने व्यक्त केले. श्रीराम जन्मभूमीचा संघर्ष एका गीतातून श्रवण करुन देशविदेशातील अनेकांनी देशपांडे काका-पुतण्यांचे कौतुकही केले आहे.


वात्रटीकाकार, कवी, लेखक मुरारी देशपांडे यांनी यापूर्वी कोविड संक्रमणाच्या काळात लिहिलेल्या ‘जा बाबा जा, करोना जा..’, विविध राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांना संबोधून लिहिलेले ‘सतरंज्या उचलू पुन्हा, स्वभाव हा आमचा जुना..’ आणि शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लिहिलेल्या ‘फुटला गं बाई फुटला..’ ही गीतं त्यांचे पुतणे सर्वेश देशपांडे यांनी संगीतबद्ध केली. दोघांनी मिळून गायलेल्या या तीनही गीतांनी जगभरात संचार केला असताना आता श्रीरामाच्या गीताने त्यांच्या प्रतिभेला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 116272

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *