नेवासा शहरात दोन गटांत ‘फ्री-स्टाईल’ हाणामारी परस्पर फिर्यादींवरुन सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नेवासा
खेळताना दोन लहान मुलांत झालेल्या भांडणावरून नेवासा शहरातील वडार गल्ली येथे दोन गटांत सोमवारी (ता.18) रात्रीच्या सुमारास तुंबळ ‘फ्री-स्टाईल’ मारामारी झाली. यात दोन्ही गटांतील एकूण पाचजण जखमी झाले. याप्रकरणी मंगळवारी (ता.19) रात्री परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादींवरून नेवासा पोलिसांत एकूण सोळा जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.

आप्पा आळपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की एकत्र खेळत असलेल्या दोन लहान मुलांत किरकोळ वाद झाला. त्यातून मुक्ताबाई मोहन इरले, संदीप मोहन इरले, किरण मोहन इरले (सर्व रा. नेवासा खुर्द), अशोक पिराजी धोत्रे, संभाजी पिराजी धोत्रे, अजय धोत्रे, शुभम धोत्रे (सर्व रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) यांनी आपल्या घरी हातात काठ्या घेऊन येत शिवीगाळ केली. दोन्ही भावांसह आईला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात आप्पा, मुकिंदा व अशोक आळपे हे तिघे जखमी झाले. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुक्ताबाई मोहन इरले (रा. वडार गल्ली, नेवासा शहर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की लहान मुलांच्या भांडणावरून मुकिंदा भीमराज आळपे, आबा भीमराज आळपे, अशोक भीमराज आळपे, सुरेश भीमराज आळपे, मोहन पिराजी डुकरे, सुनीता आबा आळपे, चांगुणाबाई भीमराज आळपे (सर्व रा. वडार गल्ली, ता. नेवासा), तसेच सचिन मुन्ना, रमेश धोत्रे, लक्ष्मी रमेश धोत्रे (दोघे रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी हातात चाकू, लोखंडी गज, दगड घेऊन माझ्या घरी येत मारहाण केली. यात भाचा व भाऊ जखमी झाले आहेत.

पोलीस निरीक्षकांची उत्कृष्ट कामगिरी..
गंगानगर, वडार गल्ली हे अतिसंवेदनशील भाग आहेत. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी हे प्रकरण मोठ्या कौशल्याने हाताळत, कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता मोठ्या शिताफीने यातील पंधरा आरोपींना अटक केली आहे. या भागात एकाचवेळी एवढ्या संख्येने आरोपींना अटक करण्याची ही कदाचित नेवासा पोलिसांची पहिलीच कारवाई असेल.
