जावेद अलीच्या ‘श्रीवल्ली’सह विविध गाण्यांवर थिरकली तरुणाई जयंती महोत्सवानिमित्त लाईव्ह कॉन्सर्ट; कीर्ती किल्लेदारनेही मिळवली वाहवा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जयंती महोत्सवात बॉलीवूडमधील आघाडीचा गायक जावेद अली याने गायलेल्या कजरा रे, वंदे मातरम, पुष्पामधील श्रीवल्ली गाण्यासह विविध गीतांवर संगमनेरमधील तरुणाईने प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात जावेद अली लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, राजवर्धन थोरात, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, शरयू देशमुख, डॉ. हर्षल तांबे आदिंसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जावेद अली लाईव्ह कॉन्सर्टसाठी जाणता राजा मैदानावर तरुणांची अलोट गर्दी होती. जर्मन हँगर मंडपाच्या बाहेरही दोन्ही बाजूला एलडी स्क्रीनची व्यवस्था केली होती, त्यामुळे संपूर्ण मैदानावर तरुणाईचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. अत्यंत झगमगटात पुष्पा फेम जावेद अलीचे व्यासपीठावर आगमन होताच तरुणाईचा एकच जल्लोष झाला. जावेद अली याने हिंदी चित्रपट सृष्टीतील तरुणाईच्या ओठावर असलेली एकापेक्षा एक सरस गाणी गायली. यामध्ये कजरारे कजरा रे तेरे काले काले नैना गाण्याला सर्वांनी ठेका धरत साथ दिली. तर पुष्पामधील श्रीवल्ली हे गाणे लागताच सर्वांनी मोठ्या उत्साहाने एकत्रित गाणे गात यावर ताल धरला. याचबरोबर सुफी गीतांची मैफिल सादर झाल्यानंतर गायलेले वंदे मातरमने सर्वांच्या अंगावर शहारे उभे केले.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, जयंती महोत्सवात सर्व कार्यक्रम दर्जेदार झाले असून जावेद अली हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यक्रम सादर करत असतात. तालुका पातळीवर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम असून या कार्यक्रमातील तरुणांचा आनंद हा मोठा आहे. यावेळी कीर्ती किल्लेदार हिने गायलेल्या मराठी गीतांनाही तरुणांनी मोठी दाद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *