संगमनेरातील ढाब्यांवर दादागिरीतून गांजाचा धूर! तरुणाई सापडतेय विळख्यात; नगरी टोळीसह स्थानिक पोलीस लाटण्यातच व्यस्त..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्याची तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असल्याचे प्रकार एकामागून एक समोर येत असतानाच आता संगमनेरातील काही ढाब्यांवर ‘नशे’साठी सुरु असलेला नंगा नाचही कानी येवू लागला आहे. या धक्कादायक प्रकारात शाळा-महाविद्यालयातील काही तरुण ओळखीच्या नजरा टाळण्यासाठी आसपासच्या ढाब्यांवर गर्दी करीत असून ढाबा चालकाच्या विरोधानंतरही जथ्याने गोळा होवून गांजाचे धूर काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. कोल्हार येथील गांजाचे केंद्र उध्वस्त झाल्यानंतर जिल्ह्यातील गांजा तस्करीचे नवीन केंद्र म्हणून संगमनेरचे नाव समोर येवू लागले असून येथील ‘लेडी डॉन’ने वितरणाचे मोठे नेटवर्क उभे केल्याने शहराच्या कानाकोपर्‍यात गांजा नावाचा घातक अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहे. सर्वसामान्यांना सहज दिसणार्‍या या गोष्टी बहिरी ससाण्याचे डोळे लाभलेल्या ‘नगरी’ टोळीसह स्थानिक पोलिसांनाही दिसत नसल्याने गांजाच्या तस्करीला कोणाचे पाठबळ आहे हे वेगळे सांगण्याची गोष्ट नाही, त्यामुळे जिल्ह्यात सध्या कुंपनच शेत खात असल्याचे विचित्र चित्र बघायला मिळत आहे.

पूर्वी जिल्ह्यातील गांजा तस्करीचे प्रमुख केंद्र म्हणून कोल्हारचा उल्लेख केला जायचा. येथून केवळ अहमदनगरच नव्हे तर आसपासच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विनासायस गांजा पोहोचवण्याची यंत्रणा दीर्घकाळ सुरु होती. मात्र दशकभरापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी कोल्हारमधील गांजा नेटवर्क उध्वस्त करुन तेथील सर्व तस्करांना गजाआड घातले. त्यानंतर प्रदीर्घ काळ त्या सर्वांना कारागृहातच खितपत पडावे लागल्याने अनेक वर्ष गांजा वितरणाचे केंद्र म्हणून काळवंडलेल्या कोल्हारचा डाग पुसला गेला. मात्र त्यातून जिल्ह्यातील गांजा वितरणाची साखळी तुटली नाही, तर त्याची जागा संगमनेरातील एका लेडी डॉनने घेतली आणि व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक जोमाने फोफावला.

काही वर्षांपूर्वी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या कारकीर्दीत कोतवाली पोलिसांनी अहमदनगर बायपास मार्गावर पकडलेल्या एका अलिशान वाहनातून कोट्यवधीचा गांजा पकडला होता. त्या घटनेतच संगमनेरची लेडी डॉन मुख्य सूत्रधार म्हणून ठळकपणे समोर आली होती. पोलीस कारवाईत त्यावेळी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती, त्यातील तिघे संगमनेर तालुक्यातील होते. त्यावेळी कोतवालीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आरोपींना फायद्याची ठरेल अशी भूमिका घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबितही केले होते. मात्र जसा काळ गेला, तसा ‘तो’ प्रसंगही मागे पडला असून आजच्या स्थितीत नगरी टोळीने पैशांसाठी वाट्टेल तो मार्ग निवडल्याने कधीकाळी शांततेने नांदणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्या कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

प्रचंड हप्तेखोरी आणि गुन्हेगारांना पोषक वातावरणाची निर्मिती करण्यात नगरी टोळी वाकबगार असल्याने गेल्या अवघ्या सहा महिन्यांतच संगमनेरातील अनेक भागात गांजा नावाचा अंमली पदार्थ सहज उपलब्ध होवू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गांजाच्या नशेकडे आजच्या विद्यार्थी दशेतील तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून शहरालगत महाविद्यालयाच्या परिसरातील चहाच्या टपर्‍यांवर सिगारेट ओढण्यासाठी झुंबड उडत असल्याचे आजवर दिसणारे चित्र आता अधिक व्यापक होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

अनेक महाविद्यालयीन तरुण ओळखीच्या नजरा टाळण्यासाठी शहरापासून काही अंतरावर जात ढाब्यांवर गर्दी करीत आहेत. सुरुवातील सिगारेट पिण्यासाठी मुले येत असल्याचे पाहून ढाबा चालकांनीही त्यांना कधी विरोध केला नाही. मात्र सदरील विद्यार्थी सिगारेट रिकामी करुन त्यात गांजा भरीत असल्याचे आणि दीर्घकाळ तेथेच रेंगाळत असल्याचे ढाबा चालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अशा विद्यार्थ्यांना विरोध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र टोळीने जाणार्‍या विद्यार्थ्यांकडून ढाबा चालकांनाच ‘दमात’ घेण्याचे प्रकारही सुरु झाल्याने संगमनेरात बिनबोभाटपणे तरुणाई गांजाचे धूर काढीत असल्याचे दिसत आहे.

कोल्हार येथील गांजाचे केंद्र उध्वस्त झाल्यानंतर संगमनेरातून मोठ्या प्रमाणात गांजाचे वितरण होते ही गोष्ट नगरी टोळीपासून ते स्थानिक पोलिसांपर्यंत कोणाच्याही नजरेतून सुटलेली नाही. संगमनेर शहरातील गजबजलेल्या भागात आजही सहज गांजा आणि गांजाने भरलेली सिगारेट उपलब्ध होते. या गोष्टी या दोन्ही यंत्रणांना माहिती नाही असे कोणी म्हटल्यास ते हास्यास्पद ठरेल, मात्र असे असतानाही आजवर ना नगरी टोळीने कधी येथील गांजा तस्करांवर कारवाई केली, ना कधी स्थानिक पोलिसांनी छापा घातला. यावरुन संगमनेरच्या गांजाचे लाभार्थीही अधोरेखीत झाले असून पैशांच्या लालसेने देशाची भावीपिढी नशेच्या गर्तेत अडकलली जात आहे.


संगमनेरसह जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारी घटनांसह अवैध व्यवसायांमध्ये होत असलेली प्रचंड वाढ, नगरी टोळीने जिल्हाभर घातलेला धुमाकूळ, परस्पर गंभीर गुन्ह्यांतील आरोपींशीही संगनमत करण्याच्या प्रवृत्तींबाबत आजवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रीय बातम्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवण्याची तयारी सुरु असून संगमनेरातील तरुणांचे एक शिष्टमंडळ लवकरच मुंबईत जावून त्यांची भेट घेणार आहे. यावेळी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतही त्यांना माहिती दिली जाणार आहे.

Visits: 7 Today: 1 Total: 29166

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *