राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत निलंबित मालेगाव येथील नुकसान अनुदान वाटपातील अनियमितता भोवली


नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. तहसीलदार राजपूत हे राहुरीत कार्यरत झाल्यापासून नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. राजपूत यांच्या कार्यपद्धतीवर लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते नेहमीच समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त करीत होते. त्यातच हा आदेश आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मालेगावचे तत्कालीन व आता राहुरी येथे असणारे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांचे मालेगाव येथील जून ते ऑक्टोबर २०२० साली झालेल्या नुकसानीच्या अनुदानात वाटपात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत निलंबन केले आहे. राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखान्याच्या मालकीच्या जमिनीतून मुरूम उत्खनन प्रकरणी त्यांचे व मुरूम वाहतूकदारांच्या अर्थपूर्ण संबंधाची चर्चा सुरू असतानाच ते निलंबित झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जून ते ऑक्टोबर २०२० साली अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले आहे. त्यांच्याविरुध्द शासन ज्ञापन २० नोव्हेंबर, २०२३ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ व १२ अन्वये विभागीय चौकशी सुरु होती. त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये चंद्रजीत राजपूत यांना तत्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्यांना मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे राहून त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असे आदेश राणे यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *