गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्या नातेवाईकांवरच गुन्हे दाखल बालमटाकळी येथील तरुणाची आत्महत्या प्रकरण; शेवगाव पोलिसांविरोधात पुन्हा संताप
नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील बालमटाकळी येथील आदित्य अरुण भोंगळे (वय 17) या युवकाने शेवगाव पोलिसांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. यास पोलीस जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्या सुमारे 35 नातेवाईकांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बालमटाकळी येथील अरुण भोंगळे या युवकाला शेवगाव पोलीस ठाण्याच्या चार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या व गावठी कट्ट्याच्या खरेदी-विक्री प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. नंतर मंगळवारीच त्याला पोलिसांनी सोडून दिले होते. मंगळवारी रात्री त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्यास पैशासाठी पोलीस त्रास देत होते. त्यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली. मी बचत गटाचे पैसे काढून 47 हजार रुपये पोलिसांना दिले आणि राहिलेले तीन हजार रुपये पोलिसांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन पे-द्वारे पाठवल्याचे मयत युवकाच्या आईने सांगितल्यानंतर शेवगावच्या अनुसूचित जातीतील नेत्यांसह मयत युवकाच्या नातेवाईकांंनी शेवगाव पोलीस ठाण्यात जमाव करून अरुण यास आत्महत्या करण्यास भाग पाडणार्या त्या चार पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली. तर दुपारी चार वाजता शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये मयत आदित्य भोंगळे याचा मृतदेह आणून पोलिसांवर गुन्हे दाखल न झाल्यास त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी दोषी पोलिसांवर ठोस कार्यवाही करू असे आश्वासन दिल्यावर हा तणाव निवळला होता. त्या आश्वासनानुसार उपअधीक्षक मुंढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अचानक पोलीस अधिकार्यांनी यू-टर्न घेत मयत आदित्य भोंगळे याचे नातेवाईक व अनुसूचित जातीतील नेते अशा 35 जणांवरच मृतदेहाची हेळसांड केल्याचा, साथरोग प्रतिबंधक कायद्याचे पालन न करता गर्दी केल्याचे, तसेच जमाव जमवून गोंधळ घातल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे अनुसूचित जातीतील नेत्यांनी पुन्हा संताप व्यक्त केला आहे. तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या 4 पोलिसांवर लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.