कोल्हार बुद्रुकमध्ये धाडसी घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लांबविला लोणी पोलिसांत गुन्हा दाखल; श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना केले पाचारण
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील झुंबरलाल कुंकूलोळ कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी (ता.10) एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला आहे.
आदिती अभिजीत वडितके या श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील असून हल्ली कोल्हार बुद्रुक येथील झुंबरलाल कुंकूलोळ कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्या गळनिंबला गेल्याने त्यांचे घर बंद होते. गुरुवारी सकाळपासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आल्याने शेजारच्या रहिवाशांनी त्यांच्याशी संपर्क करून याबाबत कळविले. आदिती वडितके यांनी समक्ष घरामध्ये येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून एक तोळ्याचे मिनी गंठण, सोन्याची चेन, चार तोळे वजनाच्या दोन पळ्या व सोन्याचा पट्टा असलेले मोठे गंठण तसेच 1 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. याबाबत खबर मिळताच श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. कॉम्प्लेक्समधील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून तपास सुरू आहे. यासंदर्भात आदिती वडितके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 550/2022 भारतीय दंडविधान कलम 457, 454, 380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.