अकोले नगरंपचायतमध्ये काँग्रेसने आमचा पराभव केला ः डॉ. लहामटे कोतूळ येथे आमदार चषक स्पर्धेच्या उद्घाटनात काँग्रेसवर जोरदार टीका

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले मतदारसंघात 268 कोटींची विकासकामे सुरू आहेत. अनेक गावांना एक-एक कोटींचा निधी दिला आहे. शहराला विकासासाठी 14.5 कोटींचा निधी दिला असे असतानाही शहराने आमचा पराभव केला. नगरपंचायत निवडणुकीत धनदांडग्यांनी आपली मते विकली आणि लोकशाहीला अशोभनीय कृत्य झालं. धनदांडग्यांनी आपली मतं विकल्याने मला पराभव स्वीकारावा लागला. मात्र हा आमचा पराभव भाजपने नव्हे तर काँग्रेसने केल्याचा आरोप आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला.

तालुक्यातील कोतूळ येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, अकोले नगरपंचायत निवडणुकीत आमचा पराभव हा काँग्रेसने घडवून आणला आहे. शहराला 14 कोटींचा निधी दिला. सत्ता दिली असती तर आणखी कामे करत आली असती. आज तालुक्यात अनेक विकासकामे चालू आहे. प्रत्येक गावाला आपण न्याय देत आहोत. मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे. गावात राजकारण येऊ न देता गुण्यागोविंदाने नांदा, वाईट गोष्टी बाजूला करून तरुणांनी गावाचा आणि स्वतःचा विकास करा असे सांगत खेळाबरोबरच जीवनाचा आनंद घ्या, असे आवाहन केले. कोतूळ गावाला मोठी विकास कामे दिली म्हणून आमदारांची गावातून ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढली, ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले. यावर आमदार लहामटे यांनी आभार मानत गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, मुळा खोर्‍यातील विकासकामांसाठी आमदारांकडे सतत पाठपुरावा करू असे सांगत आमदार लहामटे यांनी कोतूळ गावाला एक कोटींचा निधी दिला याची आठवण करुन दिली. यावेळी युवा नेते अक्षय नरवडे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, ग्रामपंचायतीचे सदस्य सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अरविंद देशमुख, चंद्रकांत घाटकर आदिंसह कोतुळेश्वर स्पोर्ट क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

Visits: 102 Today: 1 Total: 1426996

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *