मंत्री शंकरराव गडाखांच्या भावाने शेतकर्‍यांमध्ये घडवून आणला समेट! थेट बांधावर जाऊन प्रशांत गडाखांनी रस्त्याच्या कामातील अडथळा केला दूर

नायक वृत्तसेवा, नेवासा
निवडणूक काळात मंदिराकडे जाणारा रस्ता करून देतो, असे आश्वासन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले होते. निवडून आल्यावर शब्दाला जागत त्यांनी त्यासाठी 25 लाखांचा निधीही मंजूर करून दिला. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होण्यामध्ये बांधाच्या वादाची अडचण होती. अखेर मंत्री गडाख यांचे बंधू यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी यासाठी पुढाकार घेतला. बांधावर जाऊन शेतकर्‍यांमध्ये समेट घडवून आणून कामातील अडथळा दूर करून दिला.

नेवासा तालुक्यातील भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता शेताच्या बांधावरील व व्यक्तिगत वाद यामुळे बंद होता. या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने या परिसरातील पादचारी व वाड्यावस्त्यांवर रहाणारे शेतकरी ही चिंतेत होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात गडाखांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तो मंजुरही करून दिला. त्यानुसार काम सुरू झाले. तेव्हा मात्र नवीनच अडचण पुढे आली.

काम सुरू असताना बांधावर पाईप टाकण्याच्या वादामुळे या रस्त्याचे काम बंद पडले. पुन्हा प्रशांत गडाख यांनी पुढाकार घेतला. रस्त्याची पहाणी केली. वाद असलेल्या काही शेतकर्‍यांना समोरासमोर आणून त्यांची समजूत काढली. गावकर्‍यांचे हित व एकोपा जोपासण्याचे आवाहन केले. त्याचा चांगला परिणाम झाला. वाद मिटला आणि रस्त्याच्या कामाला संमती मिळाली. लगेच कामाला सुरवात झाली. गडाख यांनी शिष्टाई केल्यामुळे रस्त्यातील वाद कायमचा मिटवून रस्त्याचे काम सुरू झाले. त्यामुळे उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ प्रशांत गडाख यांचा सत्कार करू लागले. मात्र त्याला नकार देत ज्यांच्या सामंजस्याने वाद मिटला तेच खरे या सत्कारास पात्र असल्याचे सांगून गडाख यांनी दोन्हीही बाजूच्या शेतकर्‍यांचा गौरव केला.

सर्व गावकर्‍यांनी असेच गटतट बाजूला ठेऊन विकास कामात सहकार्य केल्यास गावाची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. आज जो प्रश्न समझोत्याने सुटला आहे त्याचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा. यामुळे विविध विकास कामे जोमाने करण्यास लोकप्रतिनिधींनाही ऊर्जा येईल.
– प्रशांत गडाख (अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान-नेवासा)

Visits: 179 Today: 1 Total: 1867304

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *