शिर्डी नगरपंचायतची दीपावलीनंतरच निवडणूक होण्याचे संकेत
शिर्डी नगरपंचायतची दीपावलीनंतरच निवडणूक होण्याचे संकेत
नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू
नायक वृत्तसेवा, शिर्डी
जगप्रसिद्ध तीर्थस्थान असणार्या शिर्डी नगरपंचायत वर्तुळामध्ये यावर्षी दीपावलीनंतर ‘दीपावली’ साजरी करण्याचे संकेत मिळत आहे. कार्यकाळ संपल्याने नगराध्यक्षा अर्चना कोते राजीनामा देतील. परंतु निवडणूक घेण्याची वेळ आली तर घोडेबाजार होईल आणि प्रत्येक मत लाखमोलाचे होईल. त्यामुळे नगरसेवकांचे लक्ष दीपावलीनंतरच्या संभाव्य दीपावलीकडे लागले आहे. आचारसंहितेचा काळ वगळला तर नऊ महिन्याच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
दीपावली तोंडावर आल्याने मध्यंतरी सुरू असलेल्या राजकीय हालचाली काहीशा थंडावल्या होत्या. मात्र दीपावलीनंतर नवा नगराध्यक्ष निवडल्या जाणार असल्याची बातमी काल नगरपंचायत वर्तुळात आली. त्यानंतर पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला. सध्या नगरपंचायतीवर माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व आहे. विद्यमान नगराध्यक्षा अर्चना कोते यांचा दीड वर्षाहून अधिकचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. नव्या नगराध्यक्षांची निवड करायची आहे, अशी सूचना त्यांना ‘पुन्हा’ देण्यात आली आहे. मात्र, दीपावलीनंतर त्या आपल्यापदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे सर्वानुमते एकच नाव निश्चित करणे सोपे नाही. निवडणूक झाली तर मोठी चुरस होईल. नगरसेवक मंडळींना दीपावलीनंतर दीपावली साजरी करण्याचा योग येईल. तसेच व्हावे, अशी बहुतेक सदस्यांची अपेक्षा आहे. जगन्नाथ गोंदकर, अभय शेळके, सुजित गोंदकर, अशोक गोंदकर ही नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. सर्वानुमते निवड झाली तर भाजपचे शिवाजी गोंदकर यांचेही नाव पुढे आले आहे.
विशेष म्हणजे नगरपंचायत वर्तुळात महत्वाचे निर्णय घेण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे हे पुढाकार घेत असतात. अद्याप तरी त्यांनी याबाबत भाष्य केले नाही. या सर्व घडामोडीत त्यांची भूमिका महत्वाची ठरेल. तथापि निवडणूक घेण्याची वेळ आली तर जुळवाजुळव करून ठेवलेली बरी, असा व्यवहारी विचार करून इच्छुकांनी नगरसेवक मंडळींसोबत संपर्क सुरू केला आहे. सतरा सदस्य असलेल्या या नगरपंचायतीमध्ये विखे गटाकडे दहा, मूळ भाजपचे तीन, शिवसेनेचा एक व तीन अपक्ष असे कागदावरचे बलाबल आहे. निवडणूक घेण्याची वेळ आली तर नवी राजकीय समीकरणे आकारास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीला जेमतेम एक वर्षाचा कालावधी राहिला आहे. त्यातील शेवटचे तीन महिने आचारसंहितेत जातील. मात्र, पुढील निवडणुकीसाठी प्रभाग रचना व निवडणुकीच्या तोंडावरचा जनसंपर्क या दोन बाबी महत्त्वाच्या समजल्या जातात. त्यामुळे या नगरपंचायतीवर आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी खासदार विखे दीपावलीनंतरच आपले पत्ते खुले करण्याची शक्यता आहे.