मानवी वस्त्र निर्मात्याच्या संरक्षणासाठी उत्पन्न झालेली ‘माता चौंडेश्वरी’! मूळ विणकर असलेल्या कोष्टी समाजाचे सुमारे दोनशे वर्ष प्राचिन असलेले मंदीर संगमनेरात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महर्षी देवांगांपासून निर्मित झालेला देवांग कोष्टी समाज पोटापाण्यासाठी नंतरच्या काळात देशभर विखुरला. कर्नाटकातील हंपी येथे मूळ असलेल्या विणकर जमातीच्या या समाजाची कूळदेवता विरुपाक्षिणी. हंपीतून स्थलांतर करुन ही जमात जेथे जेथे गेली, तेथे तेथे त्यांनी आपल्या समाजाच्या वसाहती निर्माण केल्या, त्यातूनच ठिकठिकाणी या समाजाने निर्माण केलेल्या कूळमातेची मंदिरे आढळून येतात. प्रांत व भाषारचनेनुसार विणकर समाजाच्या देवीच्या मूळनावात बदल झाले, मात्र देवीचे मूळस्वरुप मात्र तेच राहीले. संगमनेरातही देवांग कोष्टी समाज मोठ्या संख्येने असून या समाजाच्या पूर्वजांनी साधारणतः दोन शतकांपूर्वी निर्माण केलेले श्री चौंडेश्वरी मातेचे पुरातन मंदीर आहे. वर्षभरातील विविध सण-उत्सवांसह अखंड हरिनाम सप्ताह आणि नवरात्रौत्सवात येथे मोठी धूम असते. यंदा कोविडच्या सावटात येथील उत्सवाचा डामडौल हरपला आहे, मात्र देवीवरील श्रद्धेचा झरा अखंड वाहता असल्याने भाविक मुखदर्शनातूनही धन्यता प्राप्त करीत आहेत.

पुराणकथेनुसार नारायणाच्या नाभीकमलातून ब्रह्मदेव आणि बह्मदेवापासून सप्तऋषींचे निर्माण झाले. त्यातील मरीची ऋषींपासून निर्माण झालेल्या कश्यपी आणि ब्रह्मर्षीं या ऋषींनी ब्रह्मांडाची रचना केली. त्यात स्वर्ग, मृत्यू, पाताळ, देव, दानव, मानव, पशू-पक्षी व असंख्य जीवांचे निर्माण झाले. मात्र निर्मितीनंतर सर्वच सजीव पशूसमान अर्थात नग्न अवस्थेत होते. त्यामुळे लज्जा झाकण्यासाठी झाडाच्या पानांशिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे सृष्टीतील मानवाने महर्षी कश्यपींची भेट घेवून ‘या नग्न शरीराने खूपच मानहानी होते, जनावरे व माणसात कोणताही फरक नाही, यावर काहीतरी उपाय करा..’ अशी विनवणी केली.

महर्षी कश्यपींनी महादेवाला साकडे घातले, तेव्हा कधीकाळी मनुचा अभिमान रक्षण्यासाठी तंतू सूत्र व रेशमाला विणणार्‍या देवांग महामुनीचे महादेवाला स्मरण झाले. आणि त्यांनी आपल्या कपाळावरील तिसर्‍या नेत्रातून निर्बुण, सगुण, सूक्ष्म जटाधारी, कुंभक, सूत्रधार, मदनारी व संपूर्ण शरीराला भस्म लावलेल्या देवांग महामुनीची निर्मिती केली आणि या सृष्टीतील मानवाला शरीर झाकण्यासाठी वस्त्रनिर्माता प्राप्त झाला. त्यांच्याकडून निर्माण होणारे विविध वस्त्र सुरुवातीला देवांना देण्यास सुरुवात झाली, त्यातून दानवांचा रोष वाढेल हे माहिती असल्याने नारायणाने महर्षी देवांगांच्या रक्षणासाठी आपले सुदर्शन चक्र त्यांच्या भोवती फिरते ठेवले.

अपेक्षेप्रमाणे दानवांनी देवांग ऋषींकडे येवून वस्त्रांची मागणी केली, त्यांना धाकही दाखवले मात्र सुदर्शन चक्रापुढे त्यांचे काही चालेना. नारायणाच्या आज्ञेप्रमाणे दानवांना वस्त्र द्यावयाची नसल्याने देवांग ऋषी हतबल होते, त्यामुळे असूरांची संख्या वाढतच राहिली आणि सुदर्शनातून त्यांचा संहारही सुरु राहिला. अखेर देवांनाही या युद्धात सामील व्हावे लागले. मात्र त्यांची शक्तीआसुरांपुढे कमी पडू लागली. अखेर शिव आराधनेने शस्त्रावीण असलेल्या देवांग ऋषींच्या रक्षणासाठी महादेवाने तिसरे नेत्र उघडले. त्यातून प्रचंड अग्नीज्वाळा उसळल्या, ध्वनीचा मोठा गडगडाट झाला आणि त्यातून अष्टभूज, धनू चक्रधारी, काळरुपीणी अंबिका प्रकटली. तिच्या अक्राळविक्राळ रुपाने आसूर भयभीत झाले.

भूमि आणि पाण्यालाही तप्त करणार्‍या महिषासुर मर्दिनीला पाहून दैत्यसैन्य सैरभैर झाले. महादेवाच्या तिसर्‍या नेत्रातून प्रकटलेल्या अंबिकेने आदिशक्ती, शाकंबरी, शांकरी, बनशंकरी, तुळजाभवानी, उमा, रेणुका, सप्तश्रृंगी, यल्लमा, यमाई, भीमा, दुर्गा, काली, जोगेश्वरी, महालक्ष्मी, चौडंबिका आणि चौंडेश्वरी अशा विविध रुपात तिने देवांग ऋषींचे रक्षण केले. वस्त्र निर्माण करुन मनुष्य जातीची लज्जा राखणारे महामुनी देवांग विणकरांचे म्हणजेच कोष्टी समाजाचे कुलगुरु तर त्यांचे रक्षण करण्यासाठी असंख्य रुप धारण करणारी अंबिका चौंडेश्वरी या समाजाची कुलदेवता झाली.

सन 1760 पर्यंत विणकरांचा बहुतेक समाज कर्नाटक राज्यातील हंपी परिसरात वसाहत करुन राहत होता. त्यानंतरच्या काळात तेथून या समाजातील अनेक कुटुंब देशभरातील विविध ठिकाणी जावून स्थायिक झाले. मानवाची लज्जा झाकण्याचे काम कोष्टी जमात करीत असल्याने महाराष्ट्रात जेथे जेथे त्यांनी वसाहती केल्या तेथे-तेथे स्थानिकांनी त्यांना मदत आणि संरक्षण दिले. त्यातूनच हंपीतील मूळ विरुपाक्षिणी असलेल्या या देवीची प्रांतवार मंदिरे निर्माण झाली आणि तेथील भाषिक संस्कृतीप्रमाणे तिचे नामकरणही झाले. महाराष्ट्रातील कोष्टी समाजाच्या कुलदेवतेला चौंडेश्वरी हे नाव प्राप्त झाले.

साधारणतः 1800 च्या सुमारास संगमनेरातील विणकरांनी (कोष्टी समाज) आजच्या मेनरोडवर चौंडेश्वरी देवीचे मंदीर बांधले. या मंदिरात तीन फुट उंचीची आणि जवळपास 15 किलो वजनाची संपूर्ण पितळात घडवलेली दैत्य संहारक चौंडेश्वरी मातेची मूर्ती इच्छापूर्ती करणारी आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. 30 वर्षांपूर्वी मंदिराच्या पाठीमागील बाजूचे नूतनीकरण करुन मंगल कार्यासाठी सभागृहाची निर्मिती करण्यात आली. नवरात्रौत्सवातील नऊ दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा मात्र जगावर कोविडचे सावट असल्याने देवीची करुणा भाकण्यासाठी दूरुनच दर्शन घेण्याची व्यवस्था आहे.

Visits: 194 Today: 2 Total: 1423769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *