गुहा येथील मारहाणीच्या निषेधार्थ राहुरी तहसीलवर मोर्चा टाळ-मृदंगाच्या गजरात जावून प्रशासनाला कारवाईच्या मागणीचे दिले निवेदन
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील गुहा येथील धार्मिक वाद प्रकरणात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.२१) राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो वारकरी, गुहा तसेच पंचक्रोशीतील कानिफनाथ फक्त टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात या मोर्चात सहभागी झाले होते. गुहा येथील धार्मिक ठिकाणी दोन समाजात यापूर्वीही धार्मिक विधीवरून वाद टोकाला गेले आहेत. काही दिवसांपूर्वी याच पद्धतीने दोन्ही बाजूने वाद होत धार्मिक स्थळावर, तसेच गावात मोठ्या हाणामार्या झाल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी कानिफनाथ मंदिरात दैनंदिन पूजा करणार्या पुजार्यांवर व भजन करणार्या वारकर्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी वारकरी, गुहा तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढला. टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथभक्त वायएमसी मैदानावर एकत्रित झाले. त्यानंतर निघालेला मोर्चा नगर-मनमाड मार्ग, शहरातील मुख्य पेठ मार्गे राहुरी तहसीलवर धडकला. यावेळी रामकृष्ण हरी, कानिफनाथ महाराज की जय आदी जयघोष करण्यात आला.
या मोर्चात महंत उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावीकर, अर्जुन महाराज तनपुरे, आदिनाथ महाराज दुशिंग, किशोर महाराज जाधव, संजय महाराज शेटे, भगवान महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, श्रीकांत महाराज गागरे, नवनाथ महाराज आहेर, सुजित महाराज कदम, प्रमिला महाराज कोळसे आदिंसह संत, महंत, टाकळरी, वारकरी व नाथभक्त सहभागी झाले होते. उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावीकर, किशोर महाराज जाधव, अजय मांजरे, संपत महाराज जाधव, प्रा. एच. झेड. देशमुख यांनी आपल्या भावना प्रशासनासमोर मांडल्या.
मोर्चास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वारकरी, नाथभक्त व गुहा ग्रामस्थांनी वारकर्यांवर व पुजार्यांवर हल्ला करण्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलीस प्रशासनाला दिले. शेवटी पसायदानाने या मोर्चाची सांगता झाली.