पंतप्रधानांच्या शिर्डी दौर्यातून विखेंचे राजकीय महत्त्व वाढणार! आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा चेहरा; दौरा ‘खास’ ठरवण्यासाठी बैठकांचे सत्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येत्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्यात येणार आहेत. यापूर्वी शिर्डीतील गंगागिर महाराजांच्या सप्ताहासाठी ते आले होते, हा त्यांचा जिल्ह्यात दुसरा दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील दोघेही सक्रीय झाले आहेत. पंतप्रधानांचा शिर्डी दौरा पूर्णतः विखेंच्या आग्रहास्तव असल्याने नियोजनात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. खुद्द महसूल मंत्री आज राहाता व संगमनेर तालुक्यातील गटांमध्ये बैठका घेत आहेत. पंतप्रधानांच्या सभेसाठी दीड-दोन लाखांची गर्दी जमवण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी गावनिहाय जबाबदार्या दिल्या जात आहेत. एकंदरीत पंतप्रधानांचा हा दौरा वरकरणी विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजनाचा वाटत असला तरीही त्यातून विखे पिता-पुत्राचे महाराष्ट्रासह दिल्लीतील स्थानही उंचावणारा ठरणार आहे. माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे (दादा गट) आमदार नीलेश लंके यांचे सोबतीने झालेले देवी ‘दर्शन’ शिर्डीतील ‘खुर्ची नाट्याची’ आठवण करुन देण्यासह पंतप्रधानांच्या दौर्यापासून ते अलिप्तच असल्याचे दाखवते. त्यामुळे या दौर्यानंतर जिल्ह्याचा ‘बॉस’ विखेच राहणार यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे या सामान्य तरुणाने आंदोलनाची आग पेटवली आहे. जागोजागी होणार्या त्यांच्या सभांमुळे आरक्षण आंदोलनाची धग वाढत आहे. जरांगेंचे उपोषण सोडवताना दिलेल्या आश्वासनांमुळे राज्यातील ओबीसी समाजही एकवटला आहे. धनगर समाजाची जुनीच मागणी अजून पूर्ण झालेली नाही. वर्षभरात विधानसभेच्या तर पुढील सहा महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होतील. गेल्या काही कालावधीत राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींचा जनमाणसावर काय परिणाम झाला आहे हा प्रश्नही भाजप समोर आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री विखे यांच्याकडे मराठा समाजातील मातब्बर आणि स्वच्छ चरित्राचा राजकारणी म्हणून पाहीले जात आहे. पंतप्रधानांचा हा दौरा विखे पिता-पुत्राने दिल्लीत जावून दिलेल्या निमंत्रणाचे फलीत असल्याने पंतप्रधान मोदी त्यांच्याच आग्रहाने दुसर्यांदा जिल्ह्यात येत असल्याचे स्पष्ट आहे.

प्राथमिक माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात येणार आहेत. दोन्ही कालव्यांसह पूर्ण झालेल्या निळवंडे प्रकल्पाचे देशाला लोकार्पण, श्री साई मंदिराच्या नवीन दर्शन रांगेचे उद्घाटन, संस्थानच्या नूतन विद्यालयाचे उद्घाटन, विमानतळाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण, शिर्डीतील महसूल भवनाचे भूमिपूजन आदी कार्यक्रमांचा समावेश असलेली कार्यक्रम पत्रिका पंतप्रधान कार्यालयास पाठवण्यात आली आहे. या सगळ्या कार्यक्रमांना की यातील काही प्रमुख कार्यक्रमांनाच पंतप्रधान उपस्थित राहतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय पातळीवरही बैठकांचे सत्र राबवून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह अन्य सर्व विभागांच्या बड्या अधिकार्यांसमवेत बैठका घेवून प्रत्येक बारीक गोष्टीची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उद्घाटन व भूमीपूजन सोहळे आटोपल्यानंतर अथवा आधी काकडी विमानतळानजीक पंतप्रधानांची सभा होणार आहे. त्यासाठी तेथे भलामोठा मांडवही घातला जात आहे. एसपीजीच्या अधिकार्यांनीही संभाव्य सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष माहिती घेतली आहे. या सभेसाठी जिल्ह्यातील ३० ते ३५ हजार लाभार्थ्यांसह दीड ते दोन लाखांची गर्दी जमवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कोणतीही कमतरता राहू नये यासाठी खुद्द महसूल मंत्री विखे व खासदार डॉ. सुजय विखे दोघेही प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मागच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक बसेस वापरल्या गेल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचे समोर आले होते. तसे पुन्हा घडू नये यासाठी पालकमंत्री विखे यांनी गुरुवारी (ता.२६) सर्व शाळांना आपल्या अधिकारात सुट्टी जाहीर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना केली आहे. आवश्यक असल्यास त्या दिवसाची भरपाई अन्य सुट्टीच्या दिवशी करुन घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

भाजपानेही पंतप्रधानांच्या दौर्याबाबत आपल्या पातळीवरुन काम सुरु केले असून जिल्ह्याध्यक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आज (ता.२०) पालकमंत्री विखे पाटील जिल्ह्याच्या दौर्यावर असून त्यांनी आश्वी बु. व खुर्द, जोर्वे, पिंपरणे व अंभोरे येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून पंतप्रधानांच्या दौर्याबाबत आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. तूर्त पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व कार्यक्रमांना उपस्थितीची अनुमती मिळेल असे गृहीत धरुन पंतप्रधानांच्या आगमनापासून ते निगर्मनापर्यंत प्रत्येक गोष्टीचा आढावा खासदार डॉ. सुजय विखे घेत आहेत. प्रत्येक तालुक्यातून येणार्या वाहनांची व कार्यकर्त्यांची व्यवस्था हा देखील मोठा मुद्दा ते सांभाळीत आहेत.

एकंदरीत मध्यंतरीच्या कालावधीत विखे परिवाराच्या दिल्ली दौर्यावेळी पंतप्रधानांनी त्यांना दिलेला वेळ, त्यांच्या नातीसह काढलेली कौटुंबिक छायाचित्रे, त्यानंतरही त्यांना थेट मिळणारी भेट आणि शिर्डीला येण्याचे निमंत्रण दिल्ली दरबारात विखे परिवाराचे वाढते राजकीय वजन दर्शविणारेच आहे. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणार्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना सहकाराचे जनक मानले जाते. महाराष्ट्राचा सहकार देशाला आदर्श असल्याने भाजपाने केंद्रातही सहकार खाते निर्माण केले, त्याचे मंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे शाह व विखे यांच्यातही चांगलीच जवळीक निर्माण झाली आहे. आता पंतप्रधानही त्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा साईबाबांच्या पुण्यभूमीत येत असल्याचे राज्यातील राजकारणात ‘पाटलांचे’ आणि केंद्रीय राजकारणात ‘डॉक्टरां’चे राजकीय महत्त्व वाढणार हे नक्की.

विखेंच्या भाजप प्रवेशापासून काहीसे अडगळीत गेलेले जिल्हा भाजपचे नेते, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याबाबत शिर्डीतील एका कार्यक्रमात घडलेला खुर्ची नाराजीचा प्रकार अख्ख्या राज्याने ‘लाईव्ह’ पाहिला. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रा. शिंदे यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करावी लागली होती. त्या कार्यक्रमाचे नियोजनही विखेंनीच केले होते. तसाच प्रकार आताही घडेल अशीच काहीशी शंका आल्याने प्रा. शिंदे यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे आमदार आणि सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार नीलेश लंके यांच्यासोबत त्यांच्याच वाहनात जावून मोहटा देवीचे दर्शन घेतले. लंकेंशी त्यांची जवळीक थेट खासदार विखेंनाच इशारा असल्याचे यातून दिसून आले. त्यावर आता विखेंची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

