दीड हजार नागरिकांना जागा खाली करण्याच्या नोटिसा बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ होणार मार्गाचे विस्तारीकरण


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील बेलापूर रेल्वे स्थानकाच्या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. याकरिता श्रीरामपूर शहरातील तब्बल दीड हजार नागरिकांना जागा खाली करण्याच्या रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहे. यात काही व्यावसायिकांचाही समावेश आहे.

या परिसरात शंभर वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत आहे. अनेकांच्या नावे स्वतःचे सात-बारा उतारे सुद्धा आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीला या नोटिसा प्राप्त झाल्यानंतर आता नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची विनंती केली. माझ्याकडे नागरिक आले असून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि मी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहे.

श्रीरामपूर शहरातील बेलापूर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पाच किलोमीटर अंतराचे विस्तारीकरण करण्यासाठी आजूबाजूच्या भागात असलेल्या १५०० हून अधिक घरे आणि व्यावसायिकांना नोटीस बजावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत केंद्र आणि राज्य शासन न्याय देणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. तर भविष्यात या विषयाला धरून जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Visits: 161 Today: 1 Total: 1104705

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *