शिरपुंजे येथे पिण्याच्या पाण्यासाठी बायाबापड्यांची कसरत पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्याबाबत गटविकास अधिकार्यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील अतिदुर्गम शिरपुंजे गावात भीषण पाणी टंचाई झाली असून बायाबापड्यांना गावच्या खडकवाडी शिवारातील विहिरीतून पाणी शेंदून आणावे लागत आहे. मात्र, याच विहिरीवरुन येथील शासकीय आश्रमशाळेला पाईपलाईन करून पाणी उचलण्यात आले आहे. त्यामुळे सध्या विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने महिलांना दाही दिशा डोक्यावर हंडे घेऊन फिरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी महिलांनी गटविकास अधिकार्यांना निवेदन देऊन तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अन्यथा पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

शिरपुंजे गावासाठी ग्रामपंचायतने खडकवाडी येथे विहीर खोदली असून या विहिरीतून शासकीय आश्रमशाळा मोटार बसवून पाईपलाईनने पाणी उचलते. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतो. तर पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने हे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. परिणामी ग्रामस्थ व महिलांना पाणी विहिरीच्या तळाला गेल्याने जीवघेणी कसरत करुन शेंदून काढावे लागत आहे. त्यातही हे पाणी मातीमीश्रित येत असल्याने आजार उद्भवण्याची भीती आहे.

या परिस्थितीत आश्रमशाळेने पर्यायी व्यवस्था करावी. तसेच प्रशासनाने देखील तत्काळ पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करावे अशी मागणी केली आहे. जर आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेसाठी नवीन पाणी योजना सुरू केली तर विहिरीवरील ताण कमी होईल असे अनुसया धिंदळे, सीताबाई धिंदळे, पूजा धिंदळे, इंदूबाई धिंदळे, मच्छिंद्र धिंदळे, गंगाराम धिंदळे, लक्ष्मण धिंदळे, बाबुराव धिंदळे, चिंधू धिंदळे, माजी सरपंच हैबत धिंदळे आदिंनी गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आश्रमशाळकडे जाणारी पाईपलाईनची गळती थांबवावी. आश्रमशाळेने आपल्या वाहनातून पाणी आणावे व विद्यार्थ्यांची सोय करावी किंवा सरकारी खर्चातून पर्यायी व्यवस्था करावी.
– गंगाराम धिंदळे (ग्रामस्थ शिरपुंजे)

शिरपुंजे येथील सरपंचांनी संमती दिल्यामुळेच आम्ही विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी उचलत आहे. ज्याठिकाणी गळती आहे ती थांबवली जाईल.
– भारत सोनवणे (प्रभारी मुख्याध्यापक-शिरपुंजे आश्रमशाळा)
