कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेला जिल्ह्यात ओहोटी! मात्र नऊ दिवसांत जिल्ह्यातील वीस जणांचा मृत्यू; सक्रीय रुग्णांची संख्याही आटोक्यात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऑक्सिजन निर्मिती, रुग्णालयांतील खाटा आणि औषधांची भरमार असूनही त्यांचा फारसा वापर न करता जिल्ह्यात सुरु झालेल्या कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेला आता ओहोटी सुरु झाली आहे. चालू महिन्यात तीन दिवसांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्याही तीन आकड्यात आली असून दररोजच्या सरासरीतही मोठी घट होवू लागली आहे. गेल्या चार दिवसांत उच्चांकी रुग्ण समोर येणार्या अहमदनगर महापालिका क्षेत्रासह राहाता, नगर तालुका, श्रीरामपूर व अकोले तालुक्याच्या रुग्णगतीत मोठी घट झाली असून श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेर, शेवगाव, नेवासा व जामखेड तालुक्याच्या सरासरीत मात्र वाढ झाली आहे. मागील नऊ दिवसांत जिल्ह्यात एकूण 7 हजार 124 रुग्ण समोर आले असून 20 जणांचा कोविडने बळीही घेतला आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही सहा हजारांच्या घरात आली आहे.

कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजन आणि रुग्णालयातील खाटांची मोठी टंचाई निर्माण झाली होती. गेल्या वर्षी एप्रिल व मे या दोनच महिन्यांत उसळलेल्या दुसर्या लाटेने जिल्ह्याची अवस्था अतिशय बिकट स्थितीत नेवून पोहोचवली होती. या कालावधीत तालुकानिहाय हजारों रुग्णांना कोविडची लागण होवून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर चालू वर्षात फेब्रुवारीत संक्रमणाची तिसरी लाट येईल असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज होता. त्याप्रमाणे मागील महिन्यात 18 जानेवारीनंतर जिल्ह्याची दैनंदिन आकडेवारीही चार आकडी संख्येत पोहाचल्याने वैद्यकीय जाणकारांचा अंदाज खरा ठरतोय अशीच स्थिती निर्माण झाली होती.
![]()
मात्र जानेवारीतील मधल्या दहा दिवसांचा कालावधी वगळता जिल्ह्यात समोर येणार्या रुग्णांची संख्या चिंताजनक नव्हती. त्यातील 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज भासली नाही, त्यामुळे दुसर्या लाटेच्या अंदाजावर प्रशासनाने सज्ज केलेल्या वैद्यकीय व्यवस्थेचा फारसा उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. या कालावधीत जिल्ह्यात दुसर्या संक्रमणापेक्षाही अधिक रुग्ण समोर येतील असेही अंदाज वर्तविण्यात आले होते. मात्र गेल्या महिन्यात सरासरी 773 रुग्णगतीने 23 हजार 953 आणि चालू महिन्यात सरासरी 791 रुग्णगतीने 7 हजार 124 रुग्ण समोर आल्याने जाणकारांचा रुग्णवाढीचा अंदाज फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. अर्थात या कालावधीत संक्रमण झालेल्या हजारों रुग्णांनी कोविड चाचणी न करताच खासगी डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण विभागातून उपचार घेतल्यानेही समोर येणार्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे निरीक्षणही समोर आले.

आता गेल्या दोन दिवसांत जिल्ह्याच्या उंचावलेल्या दैनिक रुग्णवाढीत कमालीची घसरण झाल्याचे दिसत असून रोजची रुग्णसंख्या पाचशेच्या आंत आली आहे. गेल्या दिड महिन्यापासून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रासह राहाता, नगर तालुका, श्रीरामपूर, अकोले, राहुरी व कोपरगाव या तालुक्यातून मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत होते. मात्र मागील काही दिवसांत येथील सरासरीत घट झाल्याचे दिसत असून त्याचवेळी श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेर, शेवगाव, नेवासा व जामखेड या तालुक्यांमधील सरासरी रुग्णगतीमध्ये मात्र काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.

गेल्या नऊ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 792 रुग्णांच्या गतीने एकूण 7 हजार 124 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात सर्वाधीक 1 हजार 954 रुग्ण एकट्या महापालिका क्षेत्रातील आहेत. राहाता तालुक्यातून सरासरी 63 रुग्ण या गतीने 565, श्रीगोंदा 55 रुग्णगतीने 492, नगर तालुका 51 रुग्णगतीने 455, पाथर्डी 48 रुग्णगतीने 434, श्रीरामपूर 47 रुग्णगतीने 421, पारनेर 42 रुग्णगतीने 374, शेवगाव व नेवासा प्रत्येकी 36 रुग्णगतीने अनुक्रमे 321 व 319, जामखेड 30 रुग्णगतीने 267, अकोले व राहुरी प्रत्येकी 29 सरासरीने अनुक्रमे 258 व 254, कोपरगाव सरासरी 27 रुग्णगतीने 244, संगमनेर सरासरी 21 रुग्णगतीने 189 तर सर्वात कमी कर्जत तालुक्यातून सरासरी 19 रुग्णगतीने 172 रुग्णसमोर आले आहेत.

कोविड संक्रमणात टप्प्याटप्प्याने मोठी घट होत असली तरीही राज्य शासनाकडून लागू असलेले निर्बंध जिल्ह्यात कायम आहेत. पुढील महिनाभर जिल्ह्याच्या कोविड संक्रमणात अशीच घट होत राहिल्यास महिना अखेरीस जिल्ह्यातील निर्बंध हटविले जाण्याची शक्यताही आहे. मात्र त्यासाठी नागरिकांनी कोविड संक्रमण थोपविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एकंदरीत अपेक्षेप्रमाणे तिसर्या संक्रमणात समोर येणारी रुग्णसंख्या कागदावर आली नसून जेमतेम रुग्णांची नोंद घेवून तिसरी लाट ओसरु लागली आहे.
