वंचितांच्या हक्कासाठी लढणारा नेता हरपला : मुख्यमंत्री फडणवीस लोकनेते मधुकर पिचड अनंतात विलीन; शासकीय इतमामात राजूरमध्ये अंत्यसंस्कार..


नायक वृत्तसेवा, राजूर
महाराष्ट्राच्या राजकारणात दलित, आदिवासी आणि वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांची उन्नती व्हावी यासह आदिवासींच्या वन जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी मधुकरराव पिचड नेहमी कार्यतत्पर होते. राजकारणी म्हणून नव्हेतर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारा नेता अशी त्यांची राज्यात ओळख होती. ते अत्यंत मितभाषी, व्यासंगी आणि फर्डे वक्ते होते. विविध विषयांचे ज्ञान आणि व्यासंगातून त्यांनी सर्व घटकांशी संपर्क ठेवला होता. महाराष्ट्रातील एका सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने मनस्वी दुःख झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अकोले तालुक्याचे लोकनेते, माजीमंत्री, मधुकरराव पिचड यांचे शुक्रवारी (ता.6) नाशिकमध्ये उपचार सुरु असताना निधन झाले होते. दीड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेनस्ट्रोकचा धक्का बसल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत नाशिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण अकोले तालुक्यावर शोककळा पसरली. आज सकाळी अकोल्यातील अगस्ती महाविद्यालयात त्यांचे पार्थिव आणण्यात आले त्यावेळी त्यांच्या शेकडों समर्थकांनी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचे वंदन केले. दुपारी चारच्या सुमारास राजूरमधील पिचड माध्यमिक विद्याल्याच्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि आमदार डॉ.किरण लहामटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्यासह राज्यातील विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पिचड साहेबांचे जाणे ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांनी आयुष्यभर राजकारणी म्हणून नव्हेतर एक समाजसुधारक म्हणून काम केले. आदिवासींच्या हक्कांसाठी सतत लढणार्‍या या लोकनेत्याविषयीच्या आठवणी सांगताना मुख्यमंत्र्यांनी निळवंडे धरणाचा किस्सा सांगितला. धरणाचे काम थांबले त्यावेळी मधुकरराव पिचड यांनी खोळंबलेले काम मार्गी लावले. त्यामुळे शंभर किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील शेतकर्‍यांना आज पाणी मिळत आहे. भंडारदरा धरणाला थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे यांचे नाव देण्यासाठीही त्यांची आग्रही भूमिका होती. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका सुसंस्कृत, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!
लोकनेते मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर राजूरमधील पिचड विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हेमंत सावरा, राजाभाऊ वाजे, आमदार नरहरी झिरवाळ, सत्यजित तांबे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Visits: 41 Today: 5 Total: 153493

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *