आम्ही हजारो मुस्लीम मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार! शिर्डीतील मोर्चात शिवसैनिक अजीज मोमीन यांची शपथ

नायक वृत्तसेवा, शिर्डी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह फुटीर आमदारांचा निषेध करण्यात येत आहे. सोमवारी (ता.27) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिर्डी येथे शिवसैनिकांनी भव्य मोर्चा काढला. या मोर्चात भगवा ध्वज घेऊन मुस्लीम शिवसैनिक देखील सहभागी झाले होते. त्यांनी एक अब्दुल सत्तार नेला, मात्र आम्ही हजारो मुस्लीम मावळे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत. आम्ही मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार अशी शपथ मुस्लीम समाजातील शिवसैनिक अजीज मोमीन यांनी घेतली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही आज जाहीर मोर्चात सहभाग नोंदवला आहे. आम्ही शिवसेनेत काम करणारे मुस्लीम मावळे आहोत. ज्यांनी पळ काढला, अशा खासदार आणि आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो. उद्धव ठाकरे यांनी आमच्या समाजाला काय नाय दिले? त्यांचे उपकार आम्ही आयुष्यात फेडू शकणार नाही. आमचे साहेब उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या वागणुकीमुळेच आम्ही शिवसैनिक झालेलो आहोत. मी मरेपर्यंत शिवसैनिकच राहीन अशी शपथ घेतो. आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याच मागे भक्कमपणे उभे राहायचे आहे, असे मी माझ्या मुस्लीम समाजातील प्रत्येक नागरिकाला सांगत आहे. उद्धव ठाकरे हे एकच साहेब आहेत त्यांनी आमच्या समाजाला मान आणि सन्मान दिला, असे अजीज मोमीन यांनी जाहीरपणे म्हटले आहे.

मोर्चात बोलताना मोमीन यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आमचा एकच अब्दुल सत्तार नेला ना?, त्यांनी माझ्या समाजावर काळिमा फासण्याचा प्रयत्न केला. असे हजारो मुस्लीम मावळे तयार झाले. आता अब्दुल सत्तार यांना त्यांची लायकी शिवसैनिक आणि मुस्लीम समाज दाखवून देईल, असेही मोमीन पुढे म्हणाले.
