शेवगाव शहरातील भरवस्तीत दरोडा; दोघांचा मृत्यू तर एक जखमी पोलीस अधीक्षकांसह अधिकार्यांनी केली घटनास्थळाची पाहणी

नायक वृत्तसेवा, शेवगाव
येथील बालाजी मंदिराच्या समोर भरवस्तीत वास्तव्यास असलेल्या बलदवा कुटुंबियांच्या घरावर शुक्रवारी (ता.23) पहाटे 4 वाजेच्या सुमारास दरोडा पडला. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.

अहमदनगर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे उपाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या मातोश्री पुष्पा बलदवा व चुलते गोपीकिशन बलदवा यामध्ये ठार झाले. तर एक महिला जखमी झाली आहे. दरोडेखोरांनी वीट फेकून मारल्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मनेश बाहेती व माजी सहमंत्री विजय दरक यांनी सांगितले की, या घटनेने शेवगावसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बलदवा यांच्या एका मित्राने गावाला जायचे म्हणून काही रक्कम त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. चोरांनी ती देखील चोरुन नेली आहे. त्यावरुन पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर आरोपींच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शेवगाव येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय 55) यांच्या बाजारपेठेमधील राहत्या घरावर पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकला. त्यामध्ये गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरीकिशन बलवा (वय 65) या दोघांचा या दरोड्यामध्ये मृत्यू झाला. त्याचबरोबर गोपीकिशन यांच्या पत्नी सुनीता बलदवा जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे. फिंगरप्रिंट, डॉगस्कॉड पथकही पाचारण केले. यावेळी व्यापार्यांनी मोठी गर्दी केली होती.
